दिवाळीनिमित्त जाणून घ्या 'या' दिवसांची माहिती

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्त्व दिले जाते. संस्कृतमध्ये दिवाळीला दिपावली असंही म्हणतात. दिवाळीच्या दिवसांत बाजारात खरेदीला उधाण आलेलं असतं. तसंच, सगळीकडं उत्साहाचं वातावरण असतं. दिवाळीनिमित्त मिठाई, कपडे, दागिन्यांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी असते. देशात वेगवेगळ्या धर्माचे लोक असून ते आपापल्या चालीरीतीप्रमाणं दिवळी साजरी करतात. तसंच, दिवाळी साजरी करताना वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, भाऊबीज आणि बलिप्रतिपदा/पाडवा, साजरा करण्यात येतो. चला तर जाणून घेऊया दिवाळीच्या या दिवसांचं महत्व...

दिवाळीच्या दिवसांचे वर्णन

वसुबारस

दिवाळी सणाची खरी सुरुवात वसुबारस या दिवसापासून होते. वसू म्हणजे धन, बारस म्हणजे द्वादशी. या दिवशी गोवत्सपूजा करतात. हिंदुस्थान हा कृषीप्रधान देश असल्यामुळं गायीला फार महत्त्व दिले जाते. बाजरी व गुळ कुटून केलेल्या लाडूंचा नैवद्य या दिवशी गायीला दाखवला जातो.

धनत्रयोदशी

अश्विन वद्य त्रयोदशी म्हणजे धनत्रयोदशी. या दिवशी नवीन वस्तू आणि सोने-चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं. धनाच्या देवतेची या दिवशी पूजा केली जाते. आपल्या परिवाराच्या सुख, समृध्दीसाठी प्रार्थना केली जाते.

नरक चतुर्दशी

अभ्यंगस्नानाची गडबड व फटाक्यांची आतषबाजी यातच नरकचतुर्दशीची मंगल पहाट उजाडते. या दिवशी कृष्णानं नरकासुराचा वध केला होता. या दिवशी पहाटे लवकर उठून सूर्योदयापूर्वी उटणं, सुवासिक तेल, सुगंधी साबण वापरुन अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे. या दिवशी देवासमोर फराळ तसेच गोडधोड प्रसाद म्हणून ठेवल्यानंतर एकमेकांना फराळ दिला जातो आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात.

लक्ष्मीपूजन

लक्ष्मीपूजन हा दिवाळीतला सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी थाटामाटात लक्ष्मी, सरस्वती, गणपती या देवीदेवतांचं पूजन केलं जातं. या दिवशी दारात सुंदर दिव्यांची सजावट आणि रांगोळ्याही काढल्या जातात.

बलिप्रतिपदा/पाडवा

लक्ष्मीपूजनानंतर येतो तो म्बणजे पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यानं याला विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी पती पत्नीला छानशी भेट देतात. बदलत्या काळानुसार, पती आणि पत्नी दोघंही एकमेकांना भेटी देतात.

भाऊबीज

कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी करतात. या दिवशी बहिण आपल्या भावाला ओवाळते आणि भावाच्या सुखसमृद्धीसाठी तसेच त्याच्या भरभराटीसाठी प्रार्थना करते. भाऊ बहिणीला भेट देतो.


हेही वाचा -

‘इन्स्टाग्राम’वर तरुणीला धमकावणे पडले महागात

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत २३ महिला आमदार विजयी


पुढील बातमी
इतर बातम्या