‘इन्स्टाग्राम’वर तरुणीला धमकावणे पडले महागात

पीडित तरुणीला इन्स्टाग्रामच्या बनावट खात्यावरून मेसेज करत, पीडितेचा चेहरावापरून अश्लील व्हिडिओ क्लिप तिला पाठवली. त्यानंतर त्याने पीडितेला ‘मी जे सांगेल तसे करायचे’ धमकावले.

SHARE

फोटो अपलोड करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘इन्स्टाग्राम’ या सोशल मीडिया साइटवर कॉलेजमधील विद्यार्थिनींचे अश्लील फोटो टाकून धमकावणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. अक्षत दोशी असे या तरुणाचे नाव आहे. त्याने अशा प्रकारे अन्य दोन मुलींनाही धमकावल्याचे तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

दक्षिण मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयात आरोपी अक्षत हा टीवायबी काॅमचे शिक्षण घेत आहे. अक्षत हा इन्स्टाग्रामवर पीडित तरुणीचे वारंवार फोटो पहायचा. त्याने तरुणीला इन्स्टाग्रामच्या बनावट खात्यावरून मेसेज करत, तिचा चेहरा वापरून अश्लील व्हिडिओ क्लिप पाठवली. त्यानंतर त्याने तिला ‘मी जे सांगेल तसे करायचे’ असे धमकावले. बदनामीच्या भितीने पीडित तरुणीने अक्षत जे सांगेल तसे करत होती. अक्षतने तरुणीच्या नावाने बनावट खाते उघडून त्याद्वारे तो इन्स्टाग्रावरील तरुणांशी अश्लील संभाषण करायचा. अक्षतच्या त्रासाला कंटाळून अखेर तरुणीने लोकमान्य टिळक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, हा गुन्हा वरिष्ठांनी गुन्हे शाखेच्या तपासासाठी वर्ग केला. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास करून अक्षतला ताब्यात घेतले. त्याचा मोबाइल पोलिसांनी तपासला असता त्याने अशा प्रकारे इतर दोन महिलांनाही जाळ्यात ओढले असल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा -

गडोली एन्काऊंटर प्रकरणात हरियाणातून एकाला अटक
संबंधित विषय
ताज्या बातम्या