गणेशोत्सव २०१९: अग्निशमन दलाचं लालबागच्या राजाला १७ लाखांचं बिल

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

'नवसाला पावणारा राजा' अशी ख्याती असलेल्या मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनाला गणेशोत्सवात भाविकांची मोठी गर्दी असते. अशावेळी भाविकांची गैस सोय होऊ नये अथवा आग, धक्काबुक्की यांसारख्या दुर्घटना टाळण्याकरिता अग्निशमन दलातर्फे ‘लालबागच्या राजा’च्या मंडळाला सेवा देण्यात येते. या सेवेसाठी अग्निशमन दलाकडून अडीच ते तीन लाख रुपये शुल्क आकारला जातो. मात्र, यंदा या शुल्कात तब्बल ६ पटीनं वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, अग्निशमन दलाने यंदा १७ लाखाचे आगाऊ बिल मंडळाला पाठवले आहे.

भाविकांची मोठी गर्दी 

गणेशोत्सवादरम्यान लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळं या गर्दीत एखादी दुर्घटना घडू नये यासाठी अग्निशामक दलाची गाडी २४ तास ११ दिवस मंडळाच्या परिसरात उभी असते. त्यावर जवानही तैनात असतात. या सेवेसाठी अग्निशमन दलानं १७ लाखांची मागणी केली.

पुन्हा जास्त बिल

मागील वर्षी स्थापत्य समितीमध्ये नगरसेवक सचिन पडवळ आणि श्रद्धा जाधव यांनी विरोध केल्यानंतर ही रक्कम ३ लाखांवर करण्यात आली होती. मात्र, यंदा पुन्हा जास्त बिल आल्यानं मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. ज्या ठिकाणी मोठ्या जत्रा भरतात किंवा सार्वजनिक कार्यक्रम होतात तिथंही अग्निसुरक्षा पुरवली जाते. मग लालबागच्या राजा मंडळातर्फे रीतसर परवानगी घेतलेली असताना तसंच, खड्डे भरण्यासाठीही पैसे वसूल केले जातात. मग नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पालिकेची, नाही का असा सवाल करत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हे बिल न भरण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजतं.

एक अग्निशमन बंब

यंदा २ ते १२ सप्टेंबर या कालावधीत साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी एक अग्निशमन बंब कर्मचाऱ्यांसह सज्ज ठेवण्याकरिता हे बिल आकारण्यात आले आहे. पालिकेच्या प्रचलित धोरणानुसार ठरवून देण्यात आलेल्या शुल्कानुसार ही रक्कम आकारण्यात आल्याचं अग्निशमन दलाचं म्हणणं आहे.

पहिल्या ३ तासांकरिता १० हजार ६४० रुपये तर त्या पुढील प्रत्येक तासासाठी ३ हजार ६०० रुपये लावण्यात आले आहेत. एकूण २६४ तासांकरीता ९ लाख ५० हजार २४० रुपयांचे बिल आकारण्यात आलं आहे. त्यात जीएसटी व कर्मचाऱ्यांचा भत्ता मिळून १७ लाख २० हजार ९२३ रुपये आकारण्यात आलं आहे.


हेही वाचा -

गणेशोत्सव २०१९: मुंबईतील गणेश मंडळांना ‘सीपीआर’चं प्रशिक्षण

मुंबई विद्यापीठाला ‘ग्लोबल एज्युकेशन - २०१९’ पुरस्कार


पुढील बातमी
इतर बातम्या