Navratri 2020 : पांडवांनी उभारलेलं महाराष्ट्रातील जीवदानी मंदिर, सर्वांच्या इच्छा होतात पूर्ण

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

महाराष्ट्रातील अनेक शक्तिपीठांपैकी एक असलेली विरारची जीवदानी देवी भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. उंच डोंगरावर कडेकपारीत वसलेल्या या देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागते. केवळ वसई तालुक्यातच नव्हे, तर राज्यभरात या देवीची ख्यातकीर्त असून शेकडो भाविक या देवीच्या दर्शनासाठी दररोज येत असतात. आज आम्ही तुम्हाला या मंदिराच्या न ऐकलेल्या आणि खास गोष्टी सांगणार आहोत.

अनेक कथा प्रचलित

मंदिराच्या इतिहासाबद्दल आपल्यापैकी क्वचितच कुणाला माहित असावं. पुराणानुसार हे मंदिर खूप जुने आहे. हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळात बनवलं होतं, असं बोललं जातं. या पाच भावांनी वीरा गुहेत एकत्र मातेची स्थापना केली होती. पांडवांनी "पांडव डोंगरी" असं नाव दिलं जे योगी, संत आणि ऋषीमुनींचा निवासस्थान होतं.

तर काही जणांनुसार, सतराव्या शतकापर्यंत इथं जीवधन नावाचा किल्ला अस्तित्वात होता. मात्र कालौघात त्याचे अस्तित्व नष्ट झाले. मात्र त्याच्या प्राचीन खुणा अजूनही शिल्लक आहेत. याच किल्ल्यावरील हे मंदिर अजूनही अस्तित्वात आहे. १९५६ मध्ये या मंदिरात देवीच्या भक्तांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि तेव्हापासून हे मंदिर भाविकांमध्ये प्रसिद्ध झाले.

आणखी एक कथा प्रचलीत आहे ती म्हणजे, सतीच्या कलेवराचे श्री विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्रानं ५१ तुकडे केले. ज्या ज्या ठिकाणी हे तुकडे पडले तिथं देवतांची शक्तिपीठे तयार झाली. भारताबाहेर नेपाळ आणि बलुचिस्तान इथंही शक्तिपीठं आहेत. महाराष्ट्रात असलेल्या १८ शक्तिपीठांपैकी जिवदानी हे एक शक्तिपीठ आहे.

'अशी' आहे मंदिराची रचना

तब्बल ९०० फूट उंचावर असलेल्या या मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्यांची सोय करण्यात आली आहे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या गणेश मंदिरापासून या सिमेंट-काँक्रीटच्या पायऱ्या सुरू होतात. तब्बल १४०० पायऱ्या चढून मंदिरापर्यंत पोहोचता येते. मंदिराचा गाभारा पाच ते सहा फूट उंच पाषाणात खोदलेला आहे. आतमध्ये देवीची सुबक मूर्ती असून तिच्या डोईवर सुवर्ण मुकुट आहे. देवीची मूर्ती दगडात कोरलेली असून बाजूला त्रिशूळ आहे.

मंदिराला लागूनच अरुंदशी श्रीकृष्ण गुहा असून त्यालगत डोंगरात खोदलेले मोठे सभागृह आहे. या मंदिराच्या बाजूला कालिका माता, भरवनाथ, वाघोबा आदी देवतांची मंदिरे आहेत. मजल-दरमजल करत एक ते दीड तासांत आपण मंदिरापर्यंत पोहोचतो.

ज्येष्ठ नागरिक आणि काही भाविकांना पायऱ्या चढून एवढय़ा उंचावर जाणे जमत नसल्याने त्यांच्यासाठी रोप-वेची सोय आहे. विरार पूर्वेला कुठूनही या डोंगरावर नजर टाकल्यास ही भव्य इमारत आणि त्या बाजूला डोगरांवर रंगवलेला ‘ओम’ आपले लक्ष वेधून घेतो.

भक्तांची अलोट गर्दी

मंदिराचा परिसर हिरव्यागार वनराईनं नटलेला आहे. निसर्गाच्या कुशीत आणि डोंगराच्या कपारीत तब्बल सात मजल्याची भव्य इमारत जीवदानी मंदिराचा साज घेऊन उभी आहे. या देवीचे दर्शन घेण्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्य़ासह गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश येथील भाविक येतात. त्यांच्या सोयीसाठी मंदिराच्या ट्रस्टनं अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत.


हेही वाचा

navratri"="" target="_blank">Navratri Utsav 2020 : वरळीच्या भरावामुळे झाला मुंबईच्या ‘महालक्ष्मी’चा जन्म">Navratri Utsav 2020 : वरळीच्या भरावामुळे झाला मुंबईच्या ‘महालक्ष्मी’चा जन्म

यंदा 'परी हु में नाही' तर 'घरी हुं में'

पुढील बातमी
इतर बातम्या