Advertisement

Navratri Utsav 2020 : वरळीच्या भरावामुळे झाला मुंबईच्या ‘महालक्ष्मी’चा जन्म

मुंबईवर प्रसन्न असणारी महालक्ष्मी देवीचा जन्म आणि मंदिराची स्थापना कशी आणि कुणी केली हा इतिहास जाणून घ्या.

Navratri Utsav 2020 : वरळीच्या भरावामुळे झाला मुंबईच्या ‘महालक्ष्मी’चा जन्म
SHARES

मुंबईतल्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक म्हणजे महालक्ष्मी मंदिर. हे महालक्ष्मीला देवी महात्म्यचे केंद्रिय देवतेला समर्पित आहे. हे मंदिर १८३१ मध्ये धाकजी दादाजी (१७६०-१८४६) हिंदू व्यापारी यांनी बांधले होते. महालक्ष्मी परिसरातील भुलाभाई देसाई मार्गावरील मुंबईतील महालक्ष्मीचे मंदिर अशी याची ख्याती आहे.


मंदिराची रचना

महालक्ष्मी मंदिरामध्ये त्रिदेवी देवी महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांची प्रतिमा आहे. सर्व तिन्ही प्रतिमा नाक रिंग, सोन्याच्या बांगड्या आणि मोत्यांचे हार असलेल्या सुशोभित आहेत. महालक्ष्मीची प्रतिमा अग्रस्थानी म्हणजेच कमळ फुलांच्या मध्यभागी आहे.


मंदिराचा इतिहास

मुंबईचा ब्रिटीश गव्हर्नर जॉन हॉर्नबी यानं मुंबई आणि वरळी ही दोन बेट समुद्रात भरणी करून बांधून काढण्याचा चंग बांधला होता. व्यापारी असलेल्या इस्ट इंडिया कंपनीला हॉर्नबीचा हा पवित्रा बिलकुल मंजूर नव्हता. पण तरीही जॉर्न हॉर्नबी यांनी हिम्मत हारली नाही.

मुंबई महानगरपालिकेचे ‘लव्ह-ग्रोव्ह उदंचन केंद्र’ किंवा ‘अत्रीया मॉल’ आहे ते, तिथपर्यंत समुद्राचे पाणी पसरलेले होते. भरतीच्या वेळेस हे समुद्राचे पाणी पार भायखळापर्यंत पोहोचत असे. त्यामुळे मुंबई बेटातून वरळीकडे जायचे तर होडीशिवाय पर्याय नसायचा.

समुद्राचे पाणी जिथून आत घुसायचे त्या भागाला ब्रिटिशानी ‘द ग्रेट ब्रीच’ असं नाव दिलं होतं. ब्रीच म्हणजे खिंडार. ही यातायात बंद करण्याचे हॉर्नबीनं ठरवलं आणि त्यानं ही खाडी भरून काढायचा आणि मुंबई बेटातून थेट वरळी बेटापर्यंत जाता येईल असा रस्ता बांधण्याचं काम इंग्लंडच्या कार्यालयाची परवानगी न घेता चालू केलं.


‘वरळीचा बांध’ बांधण्याचं काम असं या कामाला त्यावेळी म्हटलं गेलं होतं. या बांधाच्या बांधकामाचं कंत्राट रामजी शिवजी नावाच्या पाठारे प्रभू या तरुण इंजिनिअरकडे सोपवण्यात आलं होतं. बांध घालण्याचं काम सुरू झालं. दगडाच्या राशीच्या राशी भरून तारवं इथं येऊ लागली. दगडाच्या राशी खाडीत टाकून भरणी करण्याचे काम सुरू झालं.

पण बांधकामात थोडी प्रगती झाली की समुद्राच्या पाण्याच्या रेट्यानं बांधलेला बांध कोसळून जाई आणि पुन्हा सुरुवात करावी लागे. असं बरेच महिने चाललं. पण रामजी शिवजी आणि हॉर्नबी या दोघांनीही हिम्मत हारली नाही. ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिले परंतु परत परत तेच व्हायचे!

अशावेळी एका रात्री रामजी शिवजीला महालक्ष्मीनं स्वप्नात दृष्टांत दिला आणि सांगितलं, ‘मी माझ्या बहिणींसोबत महासागराच्या तळाशी आहे. तू मला बाहेर काढ आणि मगच तुझा बांध पूर्ण होईल. रामजी शिवजीनं दृष्टान्तावर विश्वास ठेवला आणि ही घटना हॉर्नबीच्या कानावर घालायचं ठरवलं.

दुसऱ्या दिवशी रामजी शिवजीनं त्याचं स्वप्न आणि त्यातील देवीच्या दृष्टांताची गोष्ट हॉर्नबीच्या कानावर घातली आणि समुद्रात देवीच्या मूर्तींचा शोध घेण्यासाठी परवानगी मागितली. होर्नबी पक्का ब्रिटीश. या असल्या कथांवर त्याचा विश्वास असणंच शक्य नव्हतं परंतु हाती घेतलेलं काम पूर्ण होत नव्हतं.

बांध पुन्हा पुन्हा कोसळत होता. खर्च वाढत चालला होता. हॉर्नबीच्या डोक्यावर इंग्लंडची परवानगी नसताना कामाला सुरुवात केली म्हणून सस्पेन्शनची तलवार लटकत होती. अखेर त्यानं काहीही न बोलता हा ही प्रयत्न करून बघू म्हणून रामजी शिवजीला देवीच्या मूर्तींचा शोध घेण्याची परवानगी दिली.

शोधमोहिमेसाठी लहान बोटी मागवण्यात आल्या. स्थानिक मच्छिमार बंधूंची मदत घेण्यात आली. समुद्रात जाळी टाकण्यात आली आणि एकेदिवशी जाळी वर काढताना हाताला जड लागली. जाळी बाहेर काढल्यावर रामजी शिवजीच्या स्वप्नात सांगितल्याप्रमाणे त्या जाळ्यात खरोखरच महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली अशा तीन महादेविंच्या मूर्ती सापडल्या.

रामजी शिवजीनं हॉर्नबीला त्या मूर्ती दाखवून त्याचा दृष्टांत खरा झाल्याचं सांगितलं आणि या देवींच्या स्थापनेसाठी जागा देण्याची विनंती केली. हॉर्नबीनेही सध्याच्या महालक्ष्मी देवळाची जागा मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी दिली असं सांगून त्या जागी मूर्ती ठेवण्यास सांगितलं. हॉर्नबीने दिलेल्या आदेशानुसार, त्या जागी मूर्ती तात्पुरत्या स्वरुपात ठेवल्या आणि नंतर मात्र वरळीचा बांध कोणताही अडथळा न येता पूर्ण झाला.

पुढे बांध पूर्ण होऊन हॉर्नबीच्या स्वाधीन केल्यानंतर रामजी शिवजीनं त्याकाळात ८० हजार रुपये खर्चून महालक्ष्मीचे देऊळ बांधून त्यात महालक्ष्मी आणि महाकाली आणि महासरस्वती या तिच्या दोन बहिणींची मोठ्या भक्तिभावानं स्थापना केली. हे देऊळ सुमारे सन १७८४-८५ च्या सुमारास बांधलं गेलं आहे.

‘असा’ झाला महालक्ष्मीचा जन्म

वरळीच्या बांधाच्या बांधकामानं मुंबईच्या ‘महालक्ष्मी’ला जन्म दिला. या बांधामुळे मुंबईत प्रचंड प्रमाणावर जमीन उपलब्ध झाली. देशभरातील अनेक ठिकाणाहून व्यापारी, तंत्रज्ञ, कलाकार, कारागीर मुंबईत येऊ लागले. व्यापार उदीम वाढला आणि मुंबई बघता बघत देशाची आर्थिक राजधानी बनली. मुंबईचे आर्थिक जगतातील हे स्थान आजवर देशातील इतर कोणतेही शहर हिसकावून घेऊ शकलेलं नाही.

मंदिरातील पूजा

मंदिरात सकाळी ७ वाजता आणि सायंकाळी ७.३० वाजता मुख्य आरती, सकाळी ६.३० वाजता धूप आरती आणि रात्री १० वाजता शेजारती असा मंदिरातील कार्यक्रम असतो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केल्यानंतर मंदिर पूर्ण दिवस सुरू असते. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पण सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे मंदिर बंद आहे. पण नियमानुसारच एक किंवा दोन भडजी पूजा करू शकतात.  


हेही वाचा

navratra"="" target="_blank">Navratra Utsav 2020 : मुंबादेवी! मुंबईची ग्रामदैवत">Navratra Utsav 2020 : मुंबादेवी! मुंबईची ग्रामदैवत

navratri"="" target="_blank">Navratri 2020: नवरात्रौत्सव साधेपणानं, पण अनेकांच्या व्यवसायावर आर्थिक संकट">Navratri 2020: नवरात्रौत्सव साधेपणानं, पण अनेकांच्या व्यवसायावर आर्थिक संकट

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा