अन्नाची कमतरता ही एक गंभीर समस्या आहे. याचा परिणाम हजारो मुले आणि कुटुंबांच्या शिक्षण आणि आरोग्यसेवेवर होत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी अक्षय चैतन्य या संस्थेने पुढाकार घेतला आहे.
मुंबईतील ‘अक्षय चैतन्य’ यासेवाभावी संस्थेच्या निस्वार्थ प्रयत्न लक्षात घेऊन मुंबई पोर्ट अथॉरिटीने भायखळा येथील घोडापदेव येथे 30,000 चौरस फूट भूखंड मंजूर केला आहे. ज्याठिकाणी भारतातील सर्वात मोठे आणि सर्वात अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज असे स्वयंपाकघर विकसित केले जाणार आहे. या अत्याधुनिक किचनमध्ये दररोज 1,00,000 गरजूंना पौष्टिक आहार पुरवण्याची क्षमता असेल. या ऐतिहासिक प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा समारंभ सोमवारी पार पडला.
मुंबईतील महापालिका रुग्णालये, राज्य शासनाचे जे.जे. रुग्णालय तसेच टाटा कॅन्सर रुग्णालयात केवळ मुंबईतूनच नव्हे तर देशभरातून हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. हे रुग्ण व रुग्णांबरोबर येणारे नातेवाईक तसेच मुंबई महापालिका शाळांमधील सुमारे एक लाख गरजू लोकांना दररोज मोफत जेवण देण्याचा संकल्प ‘अक्षय चैतन्य’ या संस्थेने केला असून आगामी वर्षापासून हा अन्नदानाचा महायज्ञ सुरू केला जाणार आहे.
अक्षय चैतन्यच्या वतीने आजही वेगवेगळ्या घटकांना दररोज मोफत जेवण आणि पोषक आहार पुरविले जाते. 2027च्या अखेरीस, दररोज एक लाख लाभार्थ्यांना अन्न सेवा देण्याचे अक्षय्य चैतन्यने निश्चित केले आहे. ज्यामध्ये 750हून अधिक शाळांमधील बालवाडी आणि माध्यमिक इयत्तेतील (9वी आणि 10वी) 83,000 मुले आहेत.
तसेच मुंबईतील 50 हून अधिक सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या 17,000 कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. हा प्रकल्प मुंबई आणि देशासाठी चांगले आरोग्य आणि शिक्षण मिळवण्यासाठी तसेच गरजूंच्या पोषणाची पुरेपुर काळजी घेईल.
अक्षय चैतन्यचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास परचंद म्हणाले की, मुंबई पोर्ट ट्रस्टने दिलेली ही जमीन हा आमच्या उपक्रमासाठी सर्वात मोठी भेट ठरणार आहे. मुंबईत कोणाही उपाशी पोटी झोपणार नाही, असे आमचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल ठरणार आहे.
हेही वाचा