लालबाग, परळमध्ये भक्तांना 'नो एन्ट्री', कोरोनामुळे निर्बंध

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरीता लालबाग आणि परळ अशा ठिकाणी गणेशभक्तांना प्रवेश दिला जाणार नाही. मुंबईत काळाचौकी, लालबाग आणि परळ याठिकाणी अनेक नामांकित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येनं गर्दी केली जाते. पण यावर्षी कोरोनामुळे सर्वांना प्रवेश दिल जाणार नाही.

लालबागचा राजा, गणेशगल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, रंगारी बदक सार्वजनिक उत्सव मंडळ, काळाचौकीचा महागणपती, तेजुकायचा राजा, नरेपार्कचा राजा यासारख्या अनेक मंडळांचा यात समावेश असून या मंडळांच्या गणपतीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भक्तगण दर्शनाला येत असतात.

मुंबईत गणेशोत्सव धडाक्यात साजरा केला जातो. कोरोना विषाणू संसर्गामुळं उत्साहावर मर्यादा आल्या आहेत. मुंबई पोलिसांनी गणेशभक्तांना लालबाग, परळ, काळाचौकी भागात गणेश भक्तांनी येऊ नये असं आवाहन केलं आहे. यंदा कोरोनामुळे भाविकांनी प्रत्यक्ष मंडपात जाऊन दर्शन न घेता फक्त ऑनलाइन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे स्पष्ट आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहेत.

मुंबईतील लालबाग, परळ आणि काळाचौकी या ठिकाणी मोठय़ा उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. आर्कषक देखावा, उंच गणेशमूर्ती आणि इतर अनेक कारणांसाठी येथील अनेक नामांकित मंडळाच्या गणपतींना देशभरातूनच नव्हे तर जगभरातून भक्तगण दर्शनाला येत असतात.

कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता, मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही. जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या, असं कळकळीचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परत एकदा केलं आहे.

गर्दीचे कार्यक्रम टाळा. सण, उत्सव आले आहेत, त्यावर निर्बंध लावावेत असं कोणाला वाटेल? पण शेवटी आपले आरोग्य, प्राण महत्त्वाचे. उत्सव नंतरही साजरे करू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. यासोबतच त्यांनी हा देखील इशारा दिला की, रुग्ण वाढले तर लॉकडाऊन पुन्हा लावलं जाऊ शकतं.


हेही वाचा

कोरोनाला आळा घालण्यासाठी गणेशोत्सवानिमित्त धारावीसाठी विशेष नियोजन

गणेशोत्सव २०२१: विविध रुपात, त्याच जल्लोषात; पुन्हा एकदा बाप्पा मंडपात विराजमान

पुढील बातमी
इतर बातम्या