Advertisement

कोरोनाला आळा घालण्यासाठी गणेशोत्सवानिमित्त धारावीसाठी विशेष नियोजन

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तसंच, डेल्टाचा धोका आणि मुंबईत पुन्हा वाढू लागलेली रुग्णसंख्या या पार्श्वभूमीवर इथं साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे.

कोरोनाला आळा घालण्यासाठी गणेशोत्सवानिमित्त धारावीसाठी विशेष नियोजन
SHARES

गतवर्षी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तसंच, डेल्टाचा धोका आणि मुंबईत पुन्हा वाढू लागलेली रुग्णसंख्या या पार्श्वभूमीवर इथं साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे. मंडळांसोबत प्रत्यक्ष आणि ऑनलाइन बैठका, सतत संवाद साधण्यात येत आहे, तर मंडळांचे मंडप, गणेश कार्यशाळांची माहिती घेऊन गणेश आगमन-विसर्जनाचे नियोजन केले जात आहे. 

गर्दी टाळून उत्सव निर्विघ्नपणे साजरा करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. धारावीत सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी तोंडावर आलेल्या गणेशोत्सवामुळे संसर्गाचे विघ्न उभे राहू नये यासाठी पोलीस दक्षता घेत आहेत. धारावी, माटुंगा लेबर कॅम्प, शाहू नगर या ठिकाणी गणेश आगमन, विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात येतात. शिवाय १० दिवस चालणाऱ्या उत्सवात अन्नदान, सांस्कृतिक-सामाजिक उपक्रम सुरू असतात. 

या भागात जवळपास १५० हून अधिक मंडळे  आणि २० हजारांहून अधिक घरगुती गणपती असल्याने विसर्जनाला लाखो नागरिक रस्त्यावर उतरतात. ही बाब लक्षात घेऊन गतवर्षीप्रमाणे यंदाही गर्दी टाळून उत्सव पार पाडण्यासाठी पोलिसांचे नियोजन सुरू आहे. धारावी पोलीस ठाण्यानं आतापर्यंत २ बैठकांचे आयोजन करूनमंडळांच्या पदाधिकाऱ्यांना र्निबधांची माहिती दिली. वाजंत्री, मोठे मंडप, मोठ्या गणेशमूर्ती यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. 

गणेश कार्यशाळांनाही भेट देऊन मूर्तीच्या उंचीबाबत खात्री केली जात आहे. सध्या पोलिसांचा पाहणी दौरा सुरू असून मंडपाचा आकार, उत्सवाचे स्वरूप, आगमन-विसर्जन यांची माहिती घेतली जात आहे. मंडळांकडून निर्बंध डावलले जाणार नाही यासाठी कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात आहे. धारावीतील गणेशमूर्तीचे याच परिसरात विसर्जन व्हावे, नागरिक रस्त्यावर येऊ नये यासाठी महापालिकेच्या सहकार्याने ५ मोठे कृत्रिम तलाव धारावीत उभारण्यात येणार आहेच. याशिवाय काही फिरत्या विसर्जनस्थळांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा