उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी काहीतरी थंड प्यावं असं प्रत्येकालाच वाटतं. लिंबू सरबत, कोकम सरबत, पन्हे, पीयूषपर्यंत कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत. असे असले तरी ताक किंवा छास पिण्याची मजा काही वेगळीच. त्यात जर ताक स्पेशल असेल तर तुम्ही स्वत:ला ते ट्राय करण्यापासून रोखूच शकत नाहीत.
उन्हातून कामाला बाहेर पडताना थकलेल्या देहाला काहीतरी प्यायची इच्छा होते. अशा वेळी ठेल्यावर जर पांढऱ्या शुभ्र फेसाळ ताकाचे ग्लास भरलेले दिसले की, साहजिकच पावले तेथे वळतात. मीठ, सैंधव मीठ, हिंग, धने-जिरे पावडर, चाट मसाला, आल्याचा हलकासा तिखटपणा आणि मिरची-कोथिंबिरीचे मिश्रण मिक्स केलेल्या ताकाची चव येते ती अफलातूनच. आम्ही तुम्हाला एका वेगळ्या प्रकारच्या ताकाची ओळख करून देणार आहोत. हे साधे-सुधे ताक नाही आहे, तर हे आहे 'स्मोक्ड बार्बीक्यू छास'.
ताक फक्त महाराष्ट्रातच नाही, तर अगदी भारतभर प्रचंड लोकप्रिय आहे. पंजाबपासून दक्षिण भारत, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश अशा सगळीकडेच ताक मिळते. त्या-त्या भगांची खासियत त्यात पुरेपूर उतरलेली असते. असाच काहीसा हटके ताकाचा प्रकार म्हणजे स्मोक्ड बार्बीक्यू छास.
गिरगाव चौपाटीजवळील रीवायवल रेस्टॉरंटमध्ये तुम्ही हटके असं हे बार्बीक्यू छास ट्राय करू शकता. रीवायवल हे जुन्या रेस्टॉरंटपैकी एक आहे. रेस्टॉरंटच्या मालकानं हा छास प्रकार आपल्या वडिलांसाठी बनवला होता. त्यांना तो आवडला. तिथूनच पुढे स्मोक बार्बीक्यू छास बनवून त्याची विक्री करायची संकल्पना सुचली.
आत्तापर्यंत बार्बीक्यू चिकन, बार्बीक्यू मटण असे नॉनव्हेज पदार्थ आपण खाल्ले आहेत. पण हा प्रकार पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे हे ताकं बनतं कसं हे पाहणं देखील एक वेगळा अनुभव आहे. यासाठीच ते तुमच्या डोळ्या देखत स्मोक बार्बीक्यू छास बनवतात. एकूणच काय तर बदल म्हणून मुंबईकरांना हे स्मोकी बार्बीक्यू ताक प्यायला नक्कीच आवडेल.
कुठे : रीवायवल रेस्टॉरंट 39/बी, चौपाटी सीफेस, गिरगाव
वेळ : सकाळी ११ ते दुपारी ३.३० आणि संध्याकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत
हेही वाचा