फटाके फोडताय...ही बातमी वाचाच, मुलाला गमवावा लागला डोळा!

सध्या देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दिवाळी म्हटलं की फटाकेही आलेच. दिवाळीत फटाके फोडल्याशिवाय लहान मुलांची दिवाळी साजरी होत नाही. फटाके फोडताना लहान मुलांची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून वारंवार देण्यात येत असला, तरी काहीजण या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात. पण त्याची मोठी भरपाई लहान मुलांना चुकवावी लागते. ठाण्यात राहणाऱ्या एका १४ वर्षांच्या मुलाच्या बाबतीतही हेच घडलं आहे. फटाके फोडताना या मुलाला आपला डोळा गमवावा लागला आहे.

नेमकं काय झालं?

मंगळवारी नरक चतुर्दशीच्या निमित्तानं विनय केणी हा लहान मुलगा आपल्या मित्रांसोबत फटाके फोडत होता. फटाके फोडत असताना फटाक्याच्या स्फोटामुळे विनयच्या डोळ्यातअचानक दगड उडाला आणि त्याच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तातडीने त्याला मुंबईच्या जे. जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

डोळा कायमचा निकामी

जे. जे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर विनयच्या डोळ्याचा सीटी स्कॅन करण्यात आला असून लवकरचं त्याच्या उजव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रियेनंतर त्याच्या डोळ्यात दगड असेल तर तो काढण्यात येणार असला, तरी त्याचा उजवा डोळा मात्र कायमचा निकामी झाला आहे.

सध्या विनयला डॉक्टरांच्या देखरेखीसाठी ठेवण्यात आलं असून ७ ते ८ दिवसानंतर त्याच्या डोळ्याच्या प्रकृतीबाबत नेमकं सांगता येत नाही. दरम्यान मुलं फटाके फोडत असताना पालकांनी दक्षता घ्यावी. तसचं मुलांना सुतळी बॉम्ब, रॉकेट, यांसारखे विध्वंसक फटाके शक्यतो उडवायला देऊ नयेत. यामुळं अशाप्रकारच्या घटना कमी होतील.

- डॉ. तात्याराव लहाने, नेत्रचिकित्सक, जे.जे. रुग्णालय


हेही वाचा-

मुंबईकरांनो, फटाके 'या' वेळेतच उडवा, नाहीतर खावी लागेल तुरूंगाची हवा

राज यांची आतिषबाजी, मुख्यमंत्र्यांसह अमित शाहंवर टीका


पुढील बातमी
इतर बातम्या