नवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन १८० रुग्ण

नवी मुंबईत बुधवारी (२५ नोव्हेंबर) कोरोनाचे नवीन १८० रुग्ण सापडले आहेत. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४७,५५० झाली आहे. 

बुधवारी बेलापूर ४१, नेरुळ ३४, वाशी २५, तुर्भे १२, कोपरखैरणे १७, घणसोली १५, ऐरोली ३२,  दिघामध्ये ४ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ९९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. बेलापूर १४, नेरुळ १८, वाशी १५, तुर्भे ११, कोपरखैरणे १३, घणसोली १२, ऐरोलीमध्ये १६ रुग्ण बरे झाले आहेत.  

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४५,०७२ झाली आहे. तर मृतांचा आकडा ९६९ झाला आहे. नवी मुंबईत सध्या १५०३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९५ टक्के झाला आहे. 

नवी मुंबईतील घटत असलेली कोरोना रुग्ण संख्या आता दिवाळीनंतर पुन्हा वाढली आहे. त्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधीही घटून २६५ दिवसांवर आला आहे. दिवाळीपूर्वी रुग्ण दुपटीचा कालावधी ३५२ दिवस होता.

दिवाळीमध्ये अनेक नागरिक बाहेर पडले. खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाली. त्यामुळे रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली.  दिवसाला नवीन कोरोना रुग्णांची संख्या दोन अंकांवरून पुन्हा ३ अंकांवर आली आहे. 

नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शहरातील रेल्वे स्थानकांवर करोना चाचणी केंद्रे उभारण्याचे नियोजन केले आहे. सोमवारपासून वाशी, नेरुळ व बेलापूर रेल्वे स्थानक परिसरांत ही सुविधा उपलब्ध करण्यात आली असून पहिल्या दिवशी साडेतीनशे प्रवाशांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या. वाढत्या करोना रुग्णांमुळे महापालिका प्रशासनाने जास्तीत जास्त करोना चाचण्या करण्याचे ठरविले आहे. जास्तीतजास्त चाचण्या करून करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वे प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे.

शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअॅप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा -

आवाजावरून केल्या जाणाऱ्या कोरोना चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण

रुग्ण वाढल्यास ऑक्सिजन कमी पडणार नाही - एफडीए


पुढील बातमी
इतर बातम्या