मुंबईत रेमडिसिवीरचा काळाबाजार, २७२ इंजेक्शन केले जप्त

मुंबईत कोरोनाने कहर केला असताना कोरोनावरील उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचं समोर आलं आहे.  मुंबई गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत २७२ रेमडिसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत. 

मुंबईत रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने अंधेरीतील जीआर फार्मा या दुकानावर क्राइम ब्रांचने छापा मारला. याठिकाणी काळाबाजार करण्यासाठी रेमडिसिवीर इंजेक्शन लपवून ठेवली असल्याचं उघडकीस आलं. येथील २७२ रेमडिसिवीर इंजेक्शन जप्त करून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर कुणी या काळाबाजाराशी संबंधित आहे का याचा तपास केला जात आहे. 

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. यावेळी न्यायालयाची परवानगी घेऊन जप्त करण्यात आलेले रेमडिसिवीर इंजेक्शन त्वरित रुग्णालयांना देण्यात येणार आहे.

दरम्यान, गुरुवारी गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतील जोगेश्वरी भागात रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. या आरोपीकडून पोलिसांनी १२ रेमडिसिवीर इंजेक्शन जप्त केली आहेत. तर दुसरीकडे नांदेडमध्ये  देखील रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून रेमडिसिवीर ब्लॅकमध्ये विकणाऱ्या चौघांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. या चौघांकडून पोलिसांनी सात इंजेक्शनही जप्त केले आहेत. मूळ किंमत कमी असतांना रेमडिसिवीर इंजेक्शन तब्बल ८ हजार रुपयांना विक्री केली जात होती. 

दरम्यान, राज्यात रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरूवारी या इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या सात कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महाराष्ट्राला रेमडीसीवीरची कमतरता भासू नये यासाठी उत्पादन दुप्पट करावे. रुग्णालयांमध्ये रेमडीसीवीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक नेमतानाच उत्पादक कंपन्यांनी थेट शासकीय रुग्णालये आणि जिल्हाधिकाऱ्यांना इंजेक्शनचा पुरवठा करावा. काळा बाजार होऊ नये म्हणून त्याची एमआरपी कमी करावी, अशा सूचना आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी केल्या.

इंजेक्शनवरील छापील एमआरपी कमी कराव्यात अश सूचना आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केली. राज्यात कुठेही ११०० ते १४०० रुपये या किमतीत रेमडेसीवीर मिळाले पाहिजे, असे सांगतानाच राज्य आरोग्य सेवा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती या कंपन्यांशी चर्चा करून इंजेक्शनची किंमत निश्चित केली जाईल, असे टोपे यांनी सांगितलं.



हेही वाचा -

कोरोना निर्बंधांविरोधात हॉटेलचालकांचं राज्यव्यापी आंदोलन

दुकानं सुरू करण्याचा निर्णय ३ दिवस लांबणीवर

पुढील बातमी
इतर बातम्या