मुंबईकरांच्या सेवेसाठी अजून १० बाईक अॅम्ब्युलन्स, राज्यात २०

आरोग्य विभागाकडून मुंबईमध्ये सुरू करण्यात आलेल्या बाईक अॅम्ब्युलन्सला मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेता मुंबईत अजून १० आणि राज्याच्या दुर्गम आणि डोंगरी भागात २० अशा एकूण 30 नवीन बाईक अॅम्ब्युलन्स सुरू करणार असल्याचं आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितलं आहे.

मुंबईत १३०२ रूग्णांवर उपचार

मुंबईत ही सेवा सुरू झाल्यापासून पाच महिन्यांमध्ये आतापर्यंत १३०२ रुग्णांवर बाईक अॅम्ब्युलन्सच्या मदतीने उपचार करून त्यांना जीवदान देण्यात आलं आहे.

रेल्वे स्थानक परिसरातून सर्वाधिक कॉल

अरुंद रस्ते, रेल्वे स्थानकालगतचा परिसर या ठिकाणाहून बाईक अॅम्ब्युलन्सच्या सेवेसाठी कॉल मोठ्या प्रमाणावर येत आहेत. ही मोफत सेवा असून १०८ या क्रमांकावर उपलब्ध आहे.

दुर्गम भागांसाठी सर्वात उपयुक्त

१ ऑगस्ट २൦१७ ला बाईक अॅम्ब्युलन्सची सेवा मुंबईकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. अरुंद रस्ते आणि डोंगराळ भागात जिथे चारचाकी रुग्णवाहिका नेणं अशक्य आहे, त्या ठिकाणी या बाईक अॅम्ब्युलन्सने सहजरीत्या पोहोचणे शक्य आहे. याचा विचार करून राज्यातील पालघर, जव्हार, मोखाडा, नंदुरबार, मेळघाट अशा दुर्गम भागात 20 बाईक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून सेवा सुरू करणार असल्याचं आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितलं.

चालक स्वत: डॉक्टर, तातडीने उपचार

या बाईकचे चालक हे स्वतः डॉक्टर असल्यामुळे रुग्णांवर लगेचच प्रथमोपचार करून प्लॅटिनम मिनिट्समध्ये रुग्णांना उपचार देणे शक्य होणार आहे. सध्या मुंबईत भांडुप, कुरार, मालाड, चारकोप, नागपाडा, गोरेगाव फिल्म सिटी, मानखुर्द, धारावी पोलीस ठाणे, खार दांडा पोलिस ठाणे, ठाकूर व्हिलेज आणि कलिना कॅम्पस-सांताक्रुझ या ठिकाणी मोटरबाईक अॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आल्या आहेत. लवकरच, मुंबईत अजून 10 बाईक ऍम्ब्युलन्स सुरू करण्यात येतील असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या