Advertisement

मुंबईत ‘मोटार बाईक अॅम्ब्युलन्स’ सेवा सुरू


मुंबईत ‘मोटार बाईक अॅम्ब्युलन्स’ सेवा सुरू
SHARES

प्रवास करत असताना मध्येच तुमच्या छातीत दुखू लागले किंवा काही आपत्कालीन परिस्थिती ओढवली तर...विचार करूनही भीती वाटते ना? पण, आता भीती वाटण्याचे काही कारण नाही. आपत्कालीन परिस्थितीत जर तुम्ही 108 नंबरला फोन केल्यानंतर तुमच्या समोर एक मोटार बाईक अॅम्ब्युलन्स येऊन उभी राहील.

हो हे खरं आहे...कारण आजपासून मुंबईतील चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये या मोटार बाईक अॅम्ब्युलन्स तुम्हाला फिरताना दिसतील. आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला तात्काळ उपचार मिळावेत, यासाठी सरकारने मोटार बाईक अॅम्ब्युलन्स सेवा सुरू केली आहे.

आपत्कालीन परिस्थितीत आपल्याकडे 108 नंबरच्या अॅम्ब्युलन्सचा वापर केला जातो. पण, ज्या भागांमध्ये मोठी रुग्णवाहिका पोहचू शकत नाही, अशा ठिकाणच्या रुग्णांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरवण्याच्या हेतूने ‘मोटार बाईक अॅम्ब्युलन्स’ची सेवा 2 ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे.

या ‘बाईक अॅम्ब्युलन्स’वर एक प्रशिक्षित पॅरामॅडिक-डॉक्टर असणार आहे. ज्याच्याकडे रुग्णांना प्राथमिक औषधोपचार करण्यासाठी आवश्यक ती साधने असतील. मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी, दाटीवाटीच्या भागात अॅम्ब्युलन्स पोहचायला वेळ लागतो, अशा परिस्थितीत ‘मोटार बाईक अॅम्ब्युलन्स’ रुग्णाला प्रथमोपचार देईल.


रस्त्यावरील अपघात, सर्व गंभीर स्वरूपाचे रुग्ण, नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीत सापडलेले रुग्ण, हृदय विकाराचा रुग्ण, विषबाधा इ. आपत्कालीन परिस्थितीत या सेवेमार्फत रुग्णांना सुविधा पुरवण्यात येणार आहे. सध्या मुंबईमध्ये प्रायोगिक तत्वावर 10 बाईक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून या सेवेला सुरुवात होणार आहे. ही सेवा 108 या निशुल्क हेल्पलाईनच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

- डॉ. दिपक सावंत, आरोग्यमंत्री, महाराष्ट्र

याशिवाय, प्रकल्पासाठीच्या मोटार बाईक आणि वैद्यकीय उपकरणे यासाठीच्या खर्चाची तरतूद राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि आयडीबीआय बँकेच्या सीआरएसच्या माध्यमातून करण्यात आली आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात ही सुविधा महत्त्वाची ठरेल, असा विश्वासही डॉ. सावंत यांनी व्यक्त केला.


बाईक अॅम्ब्युलन्समध्ये 'या' गोष्टींचा समावेश

  • अपघातग्रस्तांना तातडीने प्रथमोपचार
  • आपत्कालीन परिस्थितीत 24 तास मोफत वैद्यकीय सेवा
  • एअर-वे किटमध्ये ऑक्सिजन मास्कसह इतर गोष्टी असतील
  • हृदयविकाराचा झटका आल्यास तात्काळ देण्यात येणारी औषधे
  • भाजल्याचे व्रण असल्यास ‘बर्न-स्प्रे’
  • इंजेक्शन आणि प्राथमिक उपचारांसाठी गोळ्या
  • आग विझवण्याचे छोटे उपकरण आणि ट्रॉमा किट


ही ‘मोटार बाईक अॅम्ब्युलन्स’ रेल्वे स्टेशन, अग्निशमन केंद्र, अशा महत्त्वाच्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांनंतर ‘मोटार बाईक अॅम्ब्युलन्स’ सुरू करणारे महाराष्ट्र देशातील चौथे राज्य आहे.


हेही वाचा -

असे ओळखा अॅलोपथी डॉक्टर! आयएमएचा नवा लोगो

तातडीने अॅम्ब्युलन्स हवी आहे? मग हे अॅप डाऊनलोड करा!


संबंधित विषय
Advertisement