आपत्कालीन परिस्थितीत धावणार बाईक अॅम्ब्युलन्स

Mumbai
आपत्कालीन परिस्थितीत धावणार बाईक अॅम्ब्युलन्स
आपत्कालीन परिस्थितीत धावणार बाईक अॅम्ब्युलन्स
See all
मुंबई  -  

मुंबईभर पसरलेली वाहतूक कोंडी आणि त्या कोंडीतून काढावी लागणारी वाट, यात अनेकदा रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी अॅम्ब्युलन्स चालवणाऱ्या चालकाला बरीच खटपट करावी लागते. तशातच दाटीवाटीच्या वस्तीत राहणारे आजारी पडले तर अनेकदा ही कोंडी संबंधित रुग्णाच्या जीवावरही बेतते. आता यावर उपाय म्हणून मुंबईतील चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये मोटारबाईक अॅम्ब्युलन्सची सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे, रुग्णांना योग्य वेळेत उपचार मिळण्यास मदत होईल.


सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मुंबईसह राज्यात 108 नंबरची अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. पण, येत्या महिन्याभरात ही बाईक अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्याचा मानस आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा आहे.

रुग्णांसाठी उपचाराचे सुरुवातीचे काही क्षण (गोल्डन अवर्स) हे फार महत्त्वाचे असतात. त्या कालावधीत त्याला आवश्यक ते उपचार मिळाले तर, हॉस्पिटलमधील पुढील मुख्य उपचार मिळेपर्यंत रुग्णाच्या जिवाला असणारा धोका टळतो. त्यामुळेच मुंबईतही सरकारच्या वतीने मोटारबाईक अॅम्ब्युलन्स सेवा या महिनाभरात सुरू करणार असल्याचा विचार आहे.

- दिलीप जाधव, प्रकल्प प्रमुख, बाईक अॅम्ब्युलन्स सेवा

सध्या अशी बाईक अॅम्ब्युलन्स सेवा गुजरात, कर्नाटक, चेन्नई या तीन शहरांत सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून या सेवेचा राज्यातील प्रकल्प प्रलंबित होता. पण, आता या बाईक अॅम्ब्युलन्सचा प्रस्ताव मार्गी लागला असून महिनाभरानंतर बाईक अॅम्ब्युलन्स मुंबईतील रस्त्यांवर धावताना दिसतील.


काय आहे बाईक अॅम्ब्युलन्समध्ये?

प्राथमिक उपचारासाठी आवश्यक असलेले ऑक्सिजन मास्क, वेदनाशामक औषधे, मलमपट्टी आदी वस्तू उपलब्ध असतील. अपघात, हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांवर सुरुवातीच्या महत्त्वाच्या (गोल्डन) कालावधीतील आवश्यक असलेले उपचार पुरवण्यात येतील. या अॅम्ब्युलन्सतील अनेक उपकरणे बॅटरीच्या साहाय्याने चालणारी असतील. सुरुवातीला या दुचाकी अग्निशमन दल आणि पोलिस स्टेशन अशा ठिकाणी उभ्या राहतील. सध्या या दुचाकीवर डॉक्टर उपलब्ध करून द्यायचे कसे, याबाबत चर्चा सुरू आहे.


कशी मिळेल मदत?

108 क्रमांकाला फोन लावल्यानंतर रुग्णाला आवश्यक वैद्यकीय गरज आणि त्याच्या ठिकाणी पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन बाईक अॅम्ब्युलन्स पाठवण्यात येणार आहे. जिथे मोठ्या रुग्णवाहिका पोहचू शकत नाहीत, तिथे या बाईक अॅम्ब्युलन्स पोहचणार आहेत. त्या बाईक अॅम्ब्युलन्सचे छोटे छोटे सेंटर्स असणार आहेत. तिथे त्या बाईक्स आपत्कालीन परिस्थितीत उपलब्ध होणार आहेत.


या अॅम्ब्युलन्सचा फायदा कोणाला?

मुंबईतील काळबादेवी, नागपाडा, सायन, धारावी, कुर्ला, भेंडीबाजार, मालाड आणि गोरेगाव या भागात मोठ्याप्रमाणात झोपडपट्ट्या आणि चिंचोळ्या गल्ल्या आहेत. या ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या अधिक असते. अशा ठिकाणी या बाईक अॅम्ब्युलन्सचा उपयोग होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांवर प्राथमिक उपचार करून त्यांना अॅम्ब्युलन्समधून रुग्णालयात सुखरूप पोहोचवण्यात येईल.


काम कसे चालणार?

नव्याने सेवेत दाखल होणाऱ्या बाईक अॅम्ब्युलन्ससाठीही 108 हाच क्रमांक असणार आहे. त्यामुळे या क्रमांकावर रुग्णाच्या नातेवाईकांना फोन केल्यानंतर त्यांची संपूर्ण माहिती आणि घरचा पत्ता घेतला जाईल. त्यानंतर कोणत्या भागातून फोन आला याची तपासणी केली जाईल. तसेच त्या भागात वाहतूककोंडी आहे किंवा नाही हे पाहून नियंत्रण विभागातून संबंधित बाईक अॅम्ब्युलन्सच्या चालकाला फोन केला जाईल, त्यानुसार बाईक अॅम्ब्युलन्स अवघ्या 10 मिनिटांत रुग्णांच्या सेेवेत दाखल होईल.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.