वैद्यकीय उपकरणांची माहिती एका क्लिकवर

 Pali Hill
वैद्यकीय उपकरणांची माहिती एका क्लिकवर

मुंबई - मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणांची खरेदी करण्यात येत असली तरी कोणत्या रुग्णालयात आणि प्रसुतिगृहात कोणती उपकरणं आहेत हे समजणं कठीण आहे. त्यामुळे, आता या उपकरणांचा शोध घेता यावा म्हणून महापालिकेनं वैद्यकीय उपकरणांवर आरएफआयडी टॅग बसवून त्यांचे मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कुठल्या रुग्णालयात कोणते उपकरण आहे याची माहिती सहज प्राप्त होणार असून यामुळे रूग्णांना सेवा पुरवणं सोपं होणार आहे.

महापालिकेच्या रुग्णालयांत विविध जैव वैद्यकीय (Bio Medical) तपासण्या करण्यासाठी विविध इलेक्ट्रॉनिक आणि 50 संगणकीय उपकरणांचा वापर केला जातो. यामध्ये सोनोग्राफीसाठी वापरले जाणारे डॉप्लर मशीन्स, हिमोडायलाझर्स, इसीटी, इसीजी, इइजी, अल्ट्रासाऊंड उपकरणे, एक्स-रे मशीन, सीटीस्कॅन, एमआरआय, ऍनेस्थेशिया मशीन यांसारख्या उपकरणांचा समावेश होतो.

या उपकरणांच्या उपलब्धतेची माहिती संगणकीय पद्धतीने तत्काळ उपलब्ध व्हावी, तसंच त्यांचं परिक्षण करणं सुलभ व्हावं, यादृष्टीने या सर्व उपकरणांवर स्टीकर पद्धतीचे आरएफआयडी टॅग बसवण्यात येणार आहेत.

आरएफआयडी हे 'बारकोड' पेक्षा अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. यानुसार साधारणपणे 15 हजार जैव वैद्यकीय उपकरणांवर आरएफआयडी टॅग बसविण्यात येणार असल्याची माहिती मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणाने दिली आहे. या टॅगमध्ये जैव वैद्यकीय उपकरण ज्या रुग्णालयात असेल त्या रुग्णालयाचे आणि संबंधित विभागाचे नाव, उपकरणाचे नाव, उत्पादकाचे नाव, मॉडेल, खरेदी दिनांक, किंमत, हमी कालावधी, परीक्षण इत्यादी 15 मुद्यांचा तपशील असणार आहे. यानुसार साठविलेली माहिती ही आरएफआयडी रीडरद्वारे वाचणं शक्य असणार आहे. ही सर्व माहिती एकत्रित पद्धतीने मध्यवर्ती संगणकावर उपलब्ध असणार आहे.

Loading Comments