आपत्कालीन सेवांसाठी आता 112 हा एकच क्रमांक

  Mumbai
  आपत्कालीन सेवांसाठी आता 112 हा एकच क्रमांक
  मुंबई  -  

  तंत्रज्ञानाच्या मदतीने आपत्कालीन परिस्थितीत सामान्यांच्या दारापर्यंत सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. पोलिस, अग्निशमन आणि आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा 112 या एकाच क्रमांकावर आणण्यासाठी वर्षा या निवासस्थानी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

  सामान्य नागरिकांना मिळणारा प्रतिसाद तातडीने आणि विनाविलंब मिळावा यासाठी यंत्रणांनी समन्वय ठेवला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या बैठकीला मुख्य सचिव सुमित मल्लिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, पोलिस महासंचालक सतीश माथुर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही. के. गौतम, वित्त विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक आदींसह पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका सेवेसाठी, पोलिसांच्या मदतीसाठी, अग्निशमन दलाच्या मदतीसाठी वेगवेगळे क्रमांक डाएल करावे लागतात. या सर्व सेवांसाठी एकच क्रमांक असावा जेणेकरून संपूर्ण राज्यातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत मदत होईल. त्यामुळे पोलिस, अग्निशमन, रुग्णवाहिका यासोबतच महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक, मुलांसाठी हेल्पलाईन सेवा या सर्व सेवांसाठी आता 112 क्रमांक ठेवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या सेवेसाठी पुणे आणि नागपूर येथे मध्यवर्ती कॉल सेंटर प्रस्तावित करण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

  आपत्कालीन परिस्थिती ओढावल्यास नागरिकांना मदतीसाठी विविध क्रमाकांच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा लागतो. या सर्व सेवांसाठी एकच क्रमांक ठेवल्यास त्याचा फायदा सामान्यांना होईल. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास नागरिकांना तात्काळ सेवा मिळण्यासाठी मदत होईल. या क्रमांकावर कॉल करणाऱ्या व्यक्तीचे स्थान (लोकेशन) समजू शकेल, अशी यंत्रणा तयार करावी. यामुळे संकटात सापडेल्या व्यक्तीला तातडीने मदत मिळेल. कॉल सेंटरला कॉल आल्याबरोबर तातडीने प्रतिसाद दिला पाहिजे. त्याचबरोबरच कॉल सेंटरला शक्यतो स्थानिक भाषेत प्रतिसाद देणारी व्यक्ती असावी.

  देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.