मुंबईतलं पहिलं इको फ्रेंडली अग्निशमन केंद्र

  Malabar Hill
  मुंबईतलं पहिलं इको फ्रेंडली अग्निशमन केंद्र
  मुंबई  -  

  मुंबईत दिवसेंदिवस उंच इमारतींची संख्या वाढत चालली आहे. आपत्तीच्या काळात या टोलेजंग इमारतींमध्ये रेस्क्यू ऑपरेशन करताना अग्निशमन दलाच्या जवानांना कसरत करावी लागत आहे. तर दुसरीकडे ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढू लागला आहे. त्यामुळे इको फ्रेंडली बांधकामांचा समावेश सर्व बांधकामांमध्ये होणे गरजेचे असतानाच यासाठी कोणतेही कडक नियम केले जात नाहीत. उलट आगीची दुघर्टना घडल्यास त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणाऱ्या अग्निशमन दलाचे केंद्रच इको फ्रेंडली बनवण्यात येत आहे. प्रियदर्शनी पार्क येथील नव्याने उभारण्यात येणारे अग्निशमन केंद्र हे चक्क बांबूपासून बनवले जात आहे. पूर्णपणे बांबूचा वापर करत झाडे, वेलींनी वेढत हे अनोखे अग्निशमन केंद्र बनवले जाणार असून, अशा प्रकारचे हे मुंबईतील पहिले केंद्र ठरणार आहे.

  महापालिकेच्या 'डी' विभागांतर्गत येणाऱ्या लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्ग (नेपियन-सी रोड) आणि भुलाभाई देसाई मार्ग (वॉर्डन रोड) परिसरात मोठ्या प्रमाणात उंच इमारती आहेत. नेपियन-सी मार्गावर असणाऱ्या प्रियदर्शनी पार्कच्या 65 हजार चौरस मीटर परिसरातील सुमारे 5 हजार चौरस मीटर जागेवर 1991च्या विकास आराखड्यामध्ये ‘अग्निशमन केंद्रा’चे आरक्षण टाकण्यात आले आहे. हेच आरक्षण 2034च्या प्रारुप विकास नियोजन आराखड्यात देखील कायम ठेवण्यात आले आहे. सदरची एकूण 65 हजार चौरस मीटरची जागा ही ‘मलबार हिल सिटीझन फोरम’ (प्रियदर्शनी पार्क) यांना दत्तक आधारावर परिरक्षणासाठी देण्यात आली होती. या आरक्षणानुसार सदर जागेवर अग्निशमन केंद्र उभारण्याविषयीच्या कार्यवाहीला मा. उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते. या बाबत 5 जून 2017 रोजी मा. न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. सदर याचिका पुन्हा सुनावणीस घेण्यासाठी संबंधितांद्वारे ‘नोटीस ऑफ मोशन’ सादर करण्यात आले होते. याबाबत 19 जून 2017 रोजी मा. उच्च न्यायालयाने आपल्या सुनावणीदरम्यान सदर भागात अग्निशमन केंद्राची गरज असल्याचे मत नमूद केले. तसेच याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेत विनंती केल्यानुसार सदर अग्निशमन केंद्र हटविण्याबाबत कुठल्याही सूचना मा. उच्च न्यायालयाने दिल्या नाहीत. याबाबत पुढील आठवड्यात सुनावणी घेण्यात येणार आहे.


  हेही वाचा

  अग्निशमन दलाच्या जवानांची सुटका नाहीच


  दरम्यान, याठिकाणी महापालिकेच्या वतीने अग्निशमन केंद्र उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे केंद्र सिमेंट, विटांच्या बांधकामांनी न करता बांबूपासून इको फ्रेंडली बनवले जाणार आहे. महापालिकेचे पहिलेच ‘हरित अग्निशमन केंद्र’ (ग्रीन फायर स्टेशन) असणार असून, बांबूचा वापर करुन उभारण्यात येणार आहे. तसेच या अग्निशमन केंद्राभोवती पुरेशा प्रमाणात झाडी, तसेच वेली लावण्याबाबत प्रशासकीय प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त आय. ए. कुंदन यांनी दिले असल्याची माहिती महापालिकेचे प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी दिली आहे.

  पाच वर्षांत या भागात 495 आगीच्या घटना -

  नेपियन-सी रोडच्या परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये लागलेल्या आगींमध्ये 'माऊंट ब्लॅक' या इमारतीला लागलेल्या आगीचा उल्लेख करावा लागेल. या दुर्दैवी घटनेत 5 पुरुष आणि 2 महिलांसह 7 व्यक्तींचा मृत्यू झाला होता, तर 30 व्यक्ती जखमी झाल्या होत्या. तसेच, भुलाभाई देसाई मार्गावरील 'तिरुपती अपार्टमेंट' येथे लागलेल्या आगीत मुंबई अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करुन 10 पुरुष आणि 16 महिलांचा जीव वाचवला होता. याच परिसरामध्ये गेल्या 5 वर्षात आगीच्या 495 घटना नोंदविण्यात आल्या आहेत.

  महापालिकेचा खोटा दावा; मुंबईत 51 अग्निशमन केंद्रे -
  ‘स्टँडिंग फायर अॅडव्हायजरी कॉन्सिल’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक 10.36 चौरस किलोमीटर मागे एक अग्निशमन केंद्र असणे आवश्यक आहे. मुंबई अग्निशमन दलाची 34 अग्निशमन केंद्रे आणि 17 छोटी अग्निशमन केंद्रे अशी एकूण 51 अग्निशमन केंद्रे आहेत. तथापि, बृहन्मुंबई महापालिका क्षेत्राची गरज लक्षात घेऊन ही संख्या वाढवण्यासाठी महापालिका कार्यवाही करत असल्याचे रहांगदळे यांनी स्पष्ट केले. परंतु, प्रत्यक्षात अग्निशमन दलाची 34 अग्निशमन केंद्रे कार्यरत असून, 17 छोट्या केंद्रांच्या उभारणीचा प्रस्ताव आहे. परंतु, ही छोटी केंद्रे अद्यापही कार्यान्वित झालेली नसून, महापालिकेने मुंबईत 51 केंद्रे असल्याचा खोटा दावा केला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.