‘रोटी डे’साठी सरसावले मराठी कलाकार-तंत्रज्ञ

आजच्या काळात ‘डे’ साजरे करण्याचा ट्रेंड आहे. यात रोझ डेपासून चाकलेट डेपर्यंत आणि मदर्स डेपासून फादर्स डेपर्यंत नाना प्रकारच्या ‘डे’जच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जातात. पण याहीपेक्षा एक असा ‘डे’ही साजरा होतो, जो आपल्या मूलभूत गरजांशी निगडीत आहे. हा आहे रोटी डे. याच रोटी डेचं औचित्य साधत सिनेसृष्टीतील ३८ हून अधिक कलाकार एकत्र आले आहेत.

माणुसकीची चळवळ

१ मार्च रोजी साजरा होणाऱ्या ‘रोटी डे’ या सामाजिक उपक्रमासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील तब्बल ३८ हून अधिक कलाकार, तंत्रज्ञ यांनी एकत्र येऊन गाणं तयार केलं आहे. गरजूंना मदत करण्याचा ‘रोटी डे’ हा उपक्रम मागील चार वर्षांपासून अभिनेता अमित कल्याणकरच्या पुढाकारानं राबविण्यात येत आहे. ‘रोटी डे’ ही कुठलीही सामाजिक संस्था नसून, एक माणुसकीची चळवळ आहे.

३८ कलाकार

नचिकेत जोग लिखित ओंकार केळकर यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला सुरेश वाडकर, वैशाली सामंत, पं. संजीव अभ्यंकर, सावनी रवींद्र, ज्ञानेश्वर मेश्राम, ऋषिकेश रानडे, डॉ. सलील कुलकर्णी, संदीप खरे, क्रीषा चिटणीस, ओंकार केळकर, आर्या आंबेकर यांचा सुरेल आवाज लाभला आहे. तर अभिनेते विक्रम गोखले, मोहन जोशी, दिलीप प्रभावळकर, मकरंद अनासपुरे, प्रवीण तरडे, प्राजक्ता माळी, संस्कृती बालगुडे, नुपूर दैठणकर, विजू माने, मेघराज राजेभोसले, सुरेश विश्वकर्मा, रमेश परदेशी, नयन जाधव, सुनील गोडबोले, देविका दफ्तरदार, सिद्धेशर झाडबुके, सौरभ गोखले, किरण यज्ञोपवित, मिलिंद शिंत्रे, बिग एम जे संग्राम, श्रीकांत यादव, विजय पटवर्धन, मालविका गायकवाड, विनोद सातव, विनोद खेडकर, देवेंद्र गायकवाड, योगेश जाधव आदी ३८ कलाकार या विशेष गाण्यात दिसणार आहेत.

कळवण्याचं आवाहन

हे गाणं डॉ. रमेश खाडे यांच्या चार्ली स्टुडीओत शूट झालं असून, मयूर जोशी यांनी छायांकीत केलं आहे. आपण १ मार्च रोजी कुठे आणि कसा ‘रोटी डे’ हा उपक्रम साजरा करणार आहात हे आपल्या नावासह मदतीचं स्वरूप स्पष्ट करत rotidayindia@gmail.com या मेल आयडीवर कळवण्याचं आवाहन अमित कल्याणकरनं केलं आहे.


हेही वाचा -

महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प सादर, जाणून घ्या महत्त्वाच्या तरतुदी

शिक्षकांचे आंदोलन मागे, निकाल वेळेतच लागणार


पुढील बातमी
इतर बातम्या