नवी मुंबईत ७२ टक्के खाटा रिकाम्या

नवी मुंबईतील कोरोनाचा संसर्ग आता आटोक्यात आला आहे. रोज सापडणाऱ्या रुग्णांचं प्रमाण घटलं आहे. तसंच रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे नवी मुंबईत ७२ टक्के खाटा रिकाम्या असल्याचं पालिकेच्या डॅशबोर्डवर दिसत आहे.

नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत होती. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने आरोग्य सुविधांत तीनपटीने वाढ केली आहे. आता मागील २० दिवसांपासून नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. एकूण ६०७३ खाटांपैकी ४३९६ खाटा आता रिकाम्या आहेत. एकूण खाटांच्या तुलनेत हे प्रमाण ७२ टक्के आहे. गेल्या आठवड्यात ३ ६९१ खाटा रिकाम्या होत्या. 

अत्यवस्थ रुग्णांसाठी असलेल्या एकूण ६०६ खाटांपैकी ८६ खाटा शिल्लक आहेत. पालिकेच्या कोरोना केअर सेंटरमधील रुग्णसंख्या कमी झाल्याने प्रवेशही बंद करण्यात येत आहेत. तीन काळजी केंद्रे तात्पुरती बंद केली असून पाच ठिकाणी नवीन प्रवेश बंद केला आहे. बुधवारपासून वाशी निर्यात भवन येथील करोना केंद्रातील नवीन रुग्णप्रवेशही बंद करण्यात आला आहे.

नवी मुंबईत आतापर्यंत कोरोनाचे ४३,७४८ रुग्ण आढळले. यातील ४११७६ रुग्ण बरे झाले आहेत. येथील कोरोनामुक्तीचा दर ९३ टक्के झाला आहे.


हेही वाचा -

Coronavirus Updates: मुंबईत चाचण्यांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत घट

नवी मुंबईत महिन्यात रुग्ण दुपटीचा कालावधी १८६ दिवसांवर

नवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन १८१ रुग्ण


पुढील बातमी
इतर बातम्या