धारावी कोरोनामुक्तीकडे, अवघे 'इतके' आहेत अ‍ॅक्टिव रुग्ण

मुंबईतील कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरलेली धारावीची आता कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.  मंगळवारी धारावीत कोरोनाचे फक्त ११ नवे रुग्ण आढळून आले आहेत. धारावीतील एकूण रुग्णसंख्या २ हजार ३९२ वर गेली आहे. मात्र, यामधील फक्त ८६ अ‍ॅक्टिव रुग्ण आहेत. म्हणजे इतक्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. धारावीत कोरोनाचा पहिला रुग्ण १ एप्रिल रोजी आढळला होता. येथील दाट लोकवस्तीमुळे कोरोनाचा फैलाव वेगाने झाला. अल्पावधीतच धारावी मुंबईतील कोरोनाची हाॅटस्पाॅट बनली. मात्र, धारावीकरांनी दाखवलेली अभूतपूर्व अशी स्वयंशिस्त आणि पालिका व सामाजिक संस्थांनी अहोरात्र केलेली मेहनत याच्या जोरावर धारावीने केरोनावर नियंत्रण मिळवलं आहे.  जागतिक आरोग्य संघटनेनेही याची दखल घेतली. 

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या महिनाभरात धारावीत कोरोना संसर्गाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर धारावीत आता अवधे ८६ अ‍ॅक्टिव रुग्ण आहेत. धारावीत चेस द व्हायरस या उपक्रमातून ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटींगची संकल्पना चार पातळीवर वेगाने राबविण्यात आली. या मोहिमेत ४७ हजार ५०० घरं डॉक्टर आणि खाजगी दवाखान्यामार्फत तपासण्यात आली.

३.६ लाख लोकांचे स्कॅनिंग करण्यात आले. १४ हजार ९७० लोकांचे मोबाइल व्हॅनद्वारे स्कॅनिंग करण्यात आले. ८२४६ ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून सर्व्हे करण्यात आला. १४ हजार लोकांना संस्थात्मक कॉरंटाइन करून त्यांचे विलगीकरण करण्यात आले. यामुळे धारावीतील कोरोनाचा आलेख झपाट्याने खाली आला.


हेही वाचा -  

मुंबईत पुढील ४८ तासांत २०० मिमी पावसाचा अंदाज

ऑगस्टमध्ये उपनगरी रेल्वेगाड्या सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार - अस्लम शेख


पुढील बातमी
इतर बातम्या