फिजेट स्पिनरचं व्यसन..योग्य की अयोग्य?

शारिरीक किंवा मानसिक ताण घालवण्यासाठी तुम्ही अनेक गोष्टी केल्या असतील. पण, आता कुठला तरी खेळ तुमचा ताण कमी करेल, असे जर तुम्हाला कोणी सांगितले, तर तुम्ही त्या गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवू नका.

हल्ली बाजारात अनेक प्रकारच्या खेळांचे ट्रेंड्स आहेत. त्यातच सध्या चर्चेत असलेला खेळ म्हणजे ‘फिजेट स्पिनर’. काही जणांच्या म्हणण्यानुसार, हा खेळ आपला शारिरीक आणि मानसिक ताण-तणाव कमी करतो. पण, वास्तवात असे काहीच नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांमध्येच या खेळाची क्रेझ आहे आणि त्यामुळे या स्पिनर्सची जोरदार विक्री देखील होत आहे.



फिजेट स्पिनरवरुन तर्क-वितर्क

आकाराने अगदी आपल्या हाताएवढा असणारा हा स्पिनर कित्येक मुलांच्या हातात सहज दिसतो. पण, हल्ली या स्पिनर्सवरुन अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. काहींचे म्हणणे आहे की, हा फिजेट स्पिनर फिरवत बसल्याने शरीराचा ताण कमी होतो. पण, या म्हणण्याला अनेक डॉक्टरांनी मात्र विरोध केला आहे.


स्पिनर हा खेळ आहे. तुम्ही काही काळासाठी हा खेळ खेळू शकता. पण, त्याने तुमचा ताण कमी होईलच याची शाश्वती नाही. यात सर्वात जास्त नुकसान हे लहान मुलांचे आहे. आधी लहान मुलांना व्हिडिओ गेम, मग मोबाईल आणि आता स्पिनर या खेळाचे आकर्षण वाटत आहे. पण, अशाने त्यांचे अभ्यासातील लक्ष कमी होऊन जाते. एका व्यसनातून मुक्त होण्यासाठी आपण दुसरे व्यसन लावतो. अशा पद्धतीचा हा खेळ आहे. त्यामुळे मुलांच्या पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष ठेवणेही तितकेच गरजेचे आहे.

- डॉ. परिक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पती


चिंता, तणाव किंवा ऑटिझम, एडीएचडी यांसारख्या मानसिक आजारांवरही हे स्पिनर उपचार म्हणून काम करते, असे काहीजण सांगतात. त्यामुळे हा फक्त मार्केटिंग फंडा असल्याचे डॉ. परिक्षित शेवडे सांगतात. कुठल्याही संशोधनाशिवाय हा शोध लावला गेला असल्याचेही डॉ. शेवडे म्हणाले.


अमेरिकेतील शाळांमधील मुलांचे लक्ष या स्पिनर्समुळे लागत नसल्याकारणाने या स्पिनर्सवर शाळांनी बंदी घातली आहे. पण, आता महाराष्ट्रातही हे स्पिनर्स बंद केले पाहिजेत. जेणेकरुन मुलांचे लक्ष अभ्यासात राहील. मध्यंतरी ड्रॅगन फळाचा ट्रेंड होता. जे खाल्ल्यानंतर आपल्याला बरे वाटते. त्यानंतर त्या फळाची किंमत प्रचंड वाढली. हा फक्त काही चायना कंपन्यांचा फायदा करण्यासाठीचा स्टंट आहे. यामुळे आपल्यावरचा ताण कमी होणार नाही.

- डॉ. परिक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पती





मनाने चंचल असलेली मुले, किंवा जास्त विचार करणाऱ्या मुलांसाठी, टेंशन घेणाऱ्यांसाठी, जी मुले एका जागी जास्त वेळ बसू शकत नाहीत, त्यांची सारखी चलबिचल सुरू असते, एडीएचडी असणारी मुले, ज्यांचे हात काहीना काही करण्यात व्यस्त असतात अशा मुलांना या स्पिनर्स खेळाचा फरक पडू शकतो. कारण ही मुले एका ठिकाणी बसली, तरी त्यांचे शरीर काहीतरी करत असते. अशा मुलांना मानसिक शांतता मिळण्यासाठी हा खेळ मदत करू शकतो. ज्यांना आनंददायी वाटत नसेल तर, हा खेळ त्यांना तो आनंद मिळवून देऊ शकतो. पण, अशा मुलांकडे पालकांनी लक्ष देणेही खूप गरजेचे आहे.

- डॉ. नूतन लोहिया, मानसोपचार तज्ज्ञ, वोक्हार्ट हॉस्पिटल

मुलांना जर मानसिक आजार असेल, तर पालकांनी काय करावे?

  • मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जा
  • मन:शांतीसाठी ध्यान आणि योगा करा
  • गाणी ऐकवा किंवा गोष्टी सांगा
  • मैदानी खेळांमध्ये मुलांसोबत खेळा


सध्याच्या बदलत्या जीवनशैलीनुसार माणसाच्या गरजा देखील बदलत आहेत. तंत्रज्ञानाने केलेली प्रगती पाहता आता यापुढे आणखी किती गोष्टींना बळी पडणार आहोत, याचा आपण सर्वांनीच विचार केला पाहिजे.



हेही वाचा

मनातलं बोलायला शिका नाहीतर..

गतिमान जीवनशैलीमुळे येते नैराश्य?


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या