मनातलं बोलायला शिका नाहीतर...

Mumbai
मनातलं बोलायला शिका नाहीतर...
मनातलं बोलायला शिका नाहीतर...
मनातलं बोलायला शिका नाहीतर...
मनातलं बोलायला शिका नाहीतर...
मनातलं बोलायला शिका नाहीतर...
See all
मुंबई  -  

'फोटोत हसणारी व्यक्ती खऱ्या आयुष्यात तेवढीच हसत असेल आणि आनंदी असेल असं नाही '  असं मी बऱ्याचदा वाचलंय आणि ऐकलंही आहे. आता हे लिहत असताना मला तो 'हम दिल दे चुके' मधला प्रसंग आठवतोय, अजय देवगण ऐश्वर्या रायचा फोटो काढण्यासाठी तिला हसायला सांगतो आणि ती फोटोसाठी स्वतःला तयार करते आणि पोज देते. म्हणजे आपल्यातले किती जण फक्त आजूबाजूला असणाऱ्या लोकांसाठी आपण आनंदी आहोत हे दाखवण्यासाठी खुश असल्याचं नाटक करतात पण त्यातले किती जण खऱ्या आयुष्यात ही तेवढेच सुखी असतात? अर्थात आता यावर पटकन म्हटलं जाईल 'आम्ही तर आहोतच आनंदी मग तसं दाखवणारच ना ' पण आपल्यातल्या बऱ्याच जणांचं तसं नाहीये. कित्येकांना त्यांच्या आयुष्यातली प्रॉब्लेम्स, दुःख, अडचणी याबद्दल समोरच्याला सांगताच येत नाही. अगदी आपल्या माणसांनांही नाही. मग ते स्वतःचे आई-वडील, भाऊ- बहीण यांच्यासमोरही त्यांचं मन मोकळं करून बोलू शकत नाहीत. अशावेळी मनात सगळ्या गोष्टी ठेऊन त्याचे खूप विचित्र परिणाम काही काळानंतर दिसू लागतात. एक प्रसंग सांगते-

माझा एक शाळेतला मित्र होता. गेली १० वर्षे तरी आम्ही एकमेकांच्या संपर्कात नव्हतो. एकदा असंच शूट वरून येताना तो मला दिसला. मग आम्ही पुन्हा संपर्कात आलो. त्याचं लग्न झालं होतं आणि १ वर्षाची गोड मुलगीही होती त्याला. अचानक मला एक दिवशी आमच्या कॉमन फ्रेंडचा कॉल आला आणि समजलं की, त्याने स्वतःच्या घरी त्या १ वर्षाच्या मुलीसमोर गळफास लावून आत्महत्या केली. हे सगळंच धक्कादायक होतं. काही दिवसांनंतर मी त्याच्या घरातल्या आणि ओळखीच्या काही लोकांशी बोलल्यावर मला समजलं की, घरात सगळं व्यवस्थित होतं. आत्महत्या केली त्या दिवशीही सकाळी त्याचं बायकोशी खूप चांगलं बोलणं झालं होतं. मग तरीही त्याने आत्महत्या का केली असावी? ही गोष्ट मला बरेच दिवस सतावत राहिली. सतत असं वाटत राहीलं की, एकदा हा माझ्याशी मनमोकळेपणाने बोलला असता, तर काहीतरी मार्ग काढू शकलो असतो. ही खंत आजही वाटते.  पण कोणालाही काहीच न सांगता त्याने स्वतःलाच संपवणं पसंत केलं होतं.

मी याविषयी मानसोपचारतज्ज्ञाशी बोलून अशा किती केसेस त्यांच्याकडे येतात आणि मनातलं न बोलण्यामुळे त्याचे काय परिणाम होऊ शकतात, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातली काही निवडक उदाहरणं तुमच्या बरोबर शेअर करते. 

* शाळेत ६ वीत शिकणारी मुलगी. वर्षाच्या सुरूवातीला खूप बडबड करणारी, मस्ती करणारी पण जस जसे महिने जाऊ लागले तिची बडबड कमी होऊ लागली. तीचं अभ्यासात लक्ष लागेनास झालं आणि शाळेत जायलाही कटकट करायची. हे असं १-२ महिने सुरू राहीलं. घरच्यांना वाटलं मैत्रिणीशी भांडण झालं असेल. पण २ महिन्यांनी तिने एक चिट्ठी लिहून स्वतःच्या हाताची नस कापून आयुष्य संपवलं होतं. तीने चिट्ठीत लिहिलं होतं की, गेले २ महिने तिला तिच्या शाळेतले एक सर खूप त्रास द्यायचे. शरीराशी चाळे करायचे आणि जर हे घरी सांगितलं तर नापास करण्याची धमकी द्यायचे. सरांचं हे वागणं आवडायचं नाही. म्हणून मी जीव देतेय.   

* एका मुलीचं नवीनच लग्न झालं होतं. लग्नाच्या काही महिन्यातच तिच्या नवऱ्याने त्या मुलीच्या घरच्यांना तिला मानसिक आजार आहे, ती नीट वागत नाही, तिला तुम्ही घरी घेऊन जा, असं सांगितलं. तिच्या घरच्यांनी तिला घरी आणलं. तिला त्यांनी डॉक्टरकडे पण नेलंं. तिला औषधेही सुरु करण्यात आली. पण, त्याचा काहीच परिणाम झाला नाही म्हणून त्यांच्या डॉक्टरांनी तिला मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. मात्र काही दिवसांतच तिने गोळ्या खाऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येनंतर तिच्या घरच्यांना समजलं की, तिच्या सासरची लोकं तिला त्रास देत होते, मारत होते. त्या त्रासाला कंटाळून ती डिप्रेशनमध्ये गेली. पण, घरच्यांना त्रास नको म्हणून तिने ते शेवटपर्यंत कोणालाच सांगितलं नाही.

* ती साधारण १९ -२० वर्षांची मुलगी. तिचं एका मुलाशी अफेअर होतं. तो तिला त्याच्या घरी बोलवायचा. एकांत मिळत गेल्यामुळे त्यांच्यामध्ये शरीरसंबंध निर्माण झाले आणि ते वाढूही लागले. सगळं छान सुरु असतानाच काही महिन्यांनी तिने अचानक आत्महत्या केल्याची बातमी आली. नंतर समजलं की, त्या मुलाने तिच्याशी संबंध तोडले होते. तो तिला टाळत होता. तिला त्याच्यासोबत शरीरसंबीेधाची सवय झाली होती. त्यामुळे तो लांब गेल्याचं दुःखं ती सहन करू शकली नाही. हे घरात कोणाला सांगण्याची हिंमत तिच्यात नव्हती म्हणून तिने आत्महत्येचा पर्याय निवडला.


* आपला प्रियकर आपल्याला सोडून गेला म्हणून साधारण १०वीतल्या एका मुलीचं डिप्रेशन एवढं वाढलं की, ती एकटीच बडबडायला लागली. नंतर रस्त्यावरून चालतानाही जोरजोरात ओरडायला लागली. शेवटी तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. अजूनही तिच्यावर उपचार सुरू आहेत.

या आणि अशा कितीतरी केसेस मी ऐकल्या ज्यात मनातल्या गोष्टी, भीती, त्रास न बोलल्यामुळे डिप्रेशन वाढलं किंवा स्वतःचा जीव गमवला. या प्रत्येक उदाहरणात जर त्यांनी घरच्यांशी, जवळच्यांशी संवाद साधला असता, तर नक्कीच त्यांनी हे मोठं पाऊल उचलून स्वतःचं आयुष्य संपवलं नसतं. हे सगळं ऐकून झाल्यावर मी त्या मानसोपचारतज्ज्ञांना काही पॉझिटीव्ह केसेस बद्दलही विचारलं.

* एका मुलीचं नवीनच लग्न झालं होतं. पण लग्नानंतर तिला तिचा नवरा पॉर्न फिल्म्स दाखवायचा आणि तिला तसेच करायला सांगायचा. काही महिने कोणालाच काहीही न सांगता ती हे सगळं सहन करत राहिली. पण नंतर तिच्या नवऱ्याच्या या मागण्या वाढतच गेल्या. त्यातून ती खूप आजारी पडली. नवऱ्याला कसं समजवावं याचा विचार करून तीला डिप्रेशन यायला लागलं. मग मात्र तिने ठरवलं की, खुप झालं, आता सहन नाही करायचं.  तिने तिच्या घरच्यांना सगळंकाही स्पष्ट सांगितलं. तिने स्वतःच मानसोपचारतज्ज्ञाकडे जाऊन उपचार सुरू केले. डिप्रेशनमधून नॉर्मल स्टेजला यायला तिला काही महिने लागले.  पण, जस जशी ती इम्प्रूव्ह होऊ लागली, त्या दरम्यान तिने डिवोर्स केस फाइल केली. तिच्यावर अजूनही उपचार सुरु आहेत. आजही तिला ते सगळं आठवलं तरी खूप रडू येतं. हे सगळं मी कोणाला सांगू शकले नसते, तर माझ्याकडे आत्महत्या करण्यापलीकडे कोणताच पर्याय नसता, असंही ती म्हणाली.  

* एक १०- १२ वर्षाचा मुलगा. खूप हुशार होता. शाळेबरोबर त्याला अभ्यासासाठी एक्स्ट्रा क्लासेस लावले होते. साधारण ३०- ३२ वर्षाची बाई त्याचे क्लासेस घ्यायची. सुरूवातीला क्लासेसला जायला तो कधीच चालढकल करत नव्हता. पण काही महिन्यांनी तो काहीतरी कारणं सांगून क्लासला दांडी मारू लागला.  त्याच्या आईला वाटलं की, त्याला अभ्यास करायचा नाही, खेळायला जायचंय म्हणून तो कारणं सांगतोय. असा विचार करून ती त्याला जबरजस्तीने क्लासला पाठवायला लागली. त्याचा परिणाम असा झाला की, तो एकटा राहू लागला, जेवण सोडलं. मग त्याच्या घरच्यांनीच त्याचा तो क्लास बंद केला. त्यानंतर त्याच्याशी रोज बोलताना हळूहळू त्यांना समजलं की, त्याची शिक्षिका त्याच्याबरोबर लैंगिक अत्याचार करत होती. तो मुलगा नंतर बरेच महिने मानसोपचार घेत होता. बऱ्याच महिन्यांनी त्याचं आयुष्य पुन्हा सुरळीत झालं. पण, जर त्याने ही गोष्ट घरच्यांना सांगितली नसती, तर नक्कीच त्याचा परिणाम वाईट झाला असता.

* एक २९ वर्षाची खूप हुशार मुलगी. ती एका ठिकाणी नवीनच जॉबला लागली. सुरूवातीला तिथली लोकं तिला चांगली वाटली पण नंतर तिच्या लक्षात आलं की, तिथे तिच्याबरोबर काम करणाऱ्यांपैकी बरेच जण डिमोटिव्हेट करायची. कोणतंही काम केलं की, त्याबद्दल वाईटच बोलायची. जॉबची गरज असल्यामुळे ती बरेच महिने काम करत राहिली. पण पुढे तिच्या मनात स्वतःबद्दलच वाईट विचार येऊ लागले. आपल्यातच काहीतरी कमी आहे, असं तीला सतत वाटू लागलं. तिची घरात-बाहेर चीडचीड होऊ लागली. तिच्यातला हा बदल तिच्या एका मैत्रिणीला जाणवला. तिने विश्वासात घेऊन तिला तिच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम सुरु आहे का, याबद्दल विचारलं. तिने सुरूवातीला जे सगळ्यांना सांगायचं टाळलं होतं, ते मैत्रीणीला सांगितलं. कोणाला तरी मोकळेपणाने सांगितल्यामुळे तीही रिलॅक्स झाली. शेवटी बराच विचार करून तिने काही महिन्यात ती नोकरी सोडली. तिच्या डिप्रेशनची ती पहिली स्टेज होती. जर तिने तीचं मन मैत्रिणींसमोर मोकळं केलं नसतं, तर नक्कीच डिप्रेशन वाढत जाऊन त्याचे परिणामही वाईट झाले असते.

आपल्या आयुष्यातल्या सिक्रेट गोष्टी किंवा शेअर न करण्यासारख्या गोष्टी, कोणाला न सांगितल्या जाण्याची वेगवेगळी कारणं आहेत. 

- कसं सांगू? समोरचा माझ्याबद्दल काय विचार करेल ?

- आपण जे विश्वासाने सांगू ते जर समोरच्याने दुसऱ्या कोणाला सांगितलं तर ?

- भीती

- सांगितल्यानंतर काहीतरी वाईट होईल आणि त्याचे परिणाम चांगले नसतील.

- कोणाला सांगू आणि त्यामुळे काय होणार आहे ?


आपण प्रत्येकाने ही गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की, आपल्या आयुष्यात काही वाईट घडतंय, काही अडचणी येत आहेत, तर त्याचे मार्गही असणार. खूप टेन्शन घेणं, स्वतःला त्रास करून घेणं आणि आत्महत्या करणं, हा त्यावरचा मार्ग नक्कीच नाही. आपण बऱ्याचदा छोट्या छोट्या गोष्टींचा खूप जास्त विचार करतो किंवा टेन्शन घेतो. हळूहळू त्याचं प्रमाण कधी वाढतं ते समजतही नाही. शेवटी त्याचं रूपांतर डिप्रेशनमध्ये होतं.

डिप्रेशनची सुरुवात होण्याची वेगवेगळी लक्षण आहेत. 

- सतत निगेटिव्ह विचार करणं.

- स्वत:चा अनादर करणं.

- चीडचीड करणं.

- छोट्या गोष्टीमुळे खूप राग येणं.

- खूप रडावसं वाटणं.

- कोणाशीही बोलण्याची इच्छा न होणं.

- खूप भूक लागणं / खाण्याची इच्छा नसणं.

- चूक आपलीच आहे असं म्हणून स्वतःला मारून घेणं.

- खूप झोप येणं / अजिबात झोप न लागणं.

- अडचणीतून बाहेर निघण्याचा कोणताही पर्याय नाही असं वाटत राहणं.

- स्वतःला संपवून प्रॉब्लम संपतील असा विचार करणं.

- दुसऱ्यांना त्रास देण्यापेक्षा स्वतःला संपवणं बरं, असं वाटणं.


अगदी काही दिवसांपूर्वीच घडलेल्या गोष्टीबद्दल बोलूया. अतुल तापकीर या निर्मात्याने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर एक पोस्ट टाकली. त्यात तो कोणत्या परिस्थितीतून जात होता हे सगळं त्याने लिहिलं होतं. पण याविषयी तो कोणाशी बोलू शकत नव्हता. सर्वात महत्वाचं म्हणजे बायकोने त्याची साथ सोडल्यामुळे तो जास्त खचत गेला. अपयश, कर्ज, बायकोची न मिळालेली साथ, मुलांपासून लांब होण्याचं दुःख आणि आपल्यामुळे  घरच्यांना होणारा त्रास अर्थात हे सगळं तो गेले कित्येक दिवस - महिने सहन करत होता. त्यावर नकारात्मक विचार करत होता. त्याचं रूपांतर डिप्रेशनमध्ये झालं आणि शेवटी डिप्रेशन वाढत जाऊन त्याचा शेवट त्याने स्वतःला संपवून केला.

बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला अशा परिस्थितीतून जाणारे लोकं कधीतरी बोलूनही जातात की, ते कोणत्या परिस्थितीतून जात आहेत, पण त्यांच्या बोलण्यात आपल्याला खूप मोठं असं काही वाटत नाही. अगदी उदाहरण द्यायचंं झालंच तर, मला खूप कंटाळा आलाय आयुष्याचा, असं वाटतं स्वत:ला संपवलं तर सगळेच प्रॉब्लेम्स संपतील, असं आपण ऐकतो पण ते तेवढं गांभीर्याने घेत नाही. आणि समोरच्याला वाटतं की, आपल्या या गोष्टीचं कोणाला काही देणं घेणं नाही. मग ते पुन्हा काहीही नं सांगणं पसंत करतात. त्यामुळे जेवढी सांगणाऱ्यांची जबाबदारी आहे, तेवढीच त्यांचं ऐकून घेण्याची आपलीही जबाबदारी आहे.   

"जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा बोलायला शिकायला हवं. निगेटिव्ह गोष्टी बोलणारे वागणारे आपल्याबाजूला बरीच लोकं असतात. पण आपण नेहमी सकारात्मक विचार करायला शिकायला हवं. लोकं तुमच्यामागे काहीही बोलत असतील, पण त्यातल्या कोणत्या गोष्टीला आपण किती महत्व द्यायला हवं, हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं. अडचणी येतात, पण त्यातून मार्ग काढण्यासाठी बोलणं महत्वाचं आहे. जो पर्यंत त्या बोलल्या जाणार नाहीत तोपर्यंत त्यातून मार्ग निघणार नाही. तेव्हा कोणतीही गोष्ट खूप त्रास द्यायला लागली, तर ती आपल्या जवळच्या माणसांशी बोलणं गरजेचं आहे." 

ज्योती सोनावणे ( मानसोपचारतज्ज्ञ )

बऱ्याच हॉस्पिटलमध्ये असे काही नंबर आहेत ज्यावर तुम्ही कॉल करून तुमचे प्रॉब्लेम सांगू शकता. तेही तुमची ओळख न सांगता. तिथले मानसोपचारतज्ज्ञ तुम्हाला योग्य ते सल्ला देऊन मदत करतात. तेव्हा यापुढे अडचणी आपल्यावर हावी होण्याआधी बोलायला शिका, मोकळं व्हायला शिका...Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.