Bird flu: महाराष्ट्रातही ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव, मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलावली बैठक

महाराष्ट्रातही (maharashtra) इतर राज्यांपाठोपाठ ‘बर्ड फ्लू’ने शिरकाव केला आहे. परभणी जिल्ह्यात ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला असून कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच (bird flu) झाल्याचं प्रयोगशाळेच्याअहवालातून स्पष्ट झालं आहे. बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं कळाल्यानंतर जिल्हा प्रशासन देखील सतर्क झालं आहे.

बर्ड फ्लू बाबतची माहिती कळताच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सायंकाळी ५ वाजता तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत बर्ड फ्लू संदर्भातील स्थिती आणि उपाययोजनांचे ते आढावा घेणार आहेत.

परभणी जिल्ह्यातील मुरूंबा गावात बचत गटाच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या पोल्ट्री फार्ममधील ८०० कोंबड्या एकाच दिवशी मरण पावल्या. या पोल्ट्री फॉर्ममध्ये ८००० हजार कोंबड्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने या कोंबड्यांचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. वैद्यकीय चिकित्सेनंतर कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं निष्पन्न झालं.

हेही वाचा- 'बर्ड फ्लू'बाबत अफवा पसरवू नका!, चिकन, अंड्यांच्या विक्रीवर अद्याप निर्बंध नाहीच

यानंतर ताबडतोब मुरुंबा गावातील १ किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या तसंच पाळीव पक्षी नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले. तर १० किमी अंतरातील कोंबड्यांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. सोबतच गावातल्या लोकांचीसुद्धा वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश परभणीचे जिल्हाधिकारी डी. एम. मुंगळीकर यांनी दिले आहेत.

बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील मुगगाव इथं रविवारी २६ कावळे मृतावस्थेत आढळले होते. त्यापैकी ३ कावळ्यांचे नमुने भोपाळला तर इतर काही नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहेत. मुंबईतील (mumbai) चेंबूर परिसरातील टाटा कॉलनीजवळ ९ कावळे रविवारी मृतावस्थेत आढळले होते. महापालिने हे  मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून तपासणी अहवाल आल्यानंतर या कावळ्यांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल.

 दरम्यान, ‘बर्ड फ्लू’ साथीचा फैलाव झालेल्या सातही राज्यांना साथप्रतिबंध आणि नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय पशूपालन मंत्रालयाने दिली आहे.

हेही वाचा- मुंबईत चिकनच्या किंमतीत १० ते २० रुपयांची घसरण

पुढील बातमी
इतर बातम्या