मुंबईतील ७० टक्के कोव्हि़ड सेंटर बंद

मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्यामुळे मुंबईतील ७० टक्के कोव्हि़ड सेंटर बंद करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने कोव्हि़ड सेंटरसाठी घेतलेले लॉज, हॉटेल्स आणि खासगी इमारतीतील खोल्या परत केल्या आहेत. 

सुरूवातीपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. झोपडपट्टीतून सापडणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या रुग्णांना क्वॉरंटाइन करण्याची गरज होती. झोपडपट्ट्यांमध्ये दाटीवाटीने राहणाऱ्या लोकांना स्वत:च्या घरातच क्वॉरंटाइन होण्यास सांगणं योग्य नव्हतं. जागेच्या अभावी त्यांना ते शक्यही नव्हतं. त्या्मुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर क्वॉरंटाइन सेंटरची आवश्यकता होती. 

त्यानुसार मुंबई महापालिकेने मुंबईतील रिकाम्या इमारती, हॉटेल्स, लॉज, लग्नाचे हॉल, स्पोर्ट्स कॉम्पलेक्स आणि मोकळी मैदाने ताब्यात घेऊन त्या ठिकाणी क्वॉरंटाइन सेंटर उभारली. संशयित रुग्णांना या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, आता झोपडपट्ट्यामंधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाल्याने आता कोविड सेंटरची गरज उरली नाही, असं पालिकेच्या आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्यानं सांगितलं. त्यामुळे ७० टक्के क्वॉरंटाइन सेंटर बंद करण्यात आले आहेत.

ई वॉर्ड असलेल्या भायखळ्यात सर्वाधिक २१ क्वॉरंटाइन सेंटर होते. त्यापैकी १९ क्वॉरंटाइन सेंटर बंद करण्यात आले आहेत. त्यानंतर धारावी असलेल्या जी उत्तर विभागात १९ कोविड केंद्र होते. त्यापैकी ११ केंद्र बंद करण्यात आली आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या