कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. यामुळे शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वॉक इन सुविधेद्वारे लस देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई महापालिकेकडून लसीकरणाबाबतच्या सुधारित नियमावलीनुसार, ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे त्यांना वॉक इन (Walk In) सुविधेद्वारे लस दिली जाणार आहे. यात १८ ते ४४ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश असेल. या विद्यार्थ्यांना कस्तुरबा, राजावाडी, कुपर रुग्णालयात लसीकरणाची वॉक इन सुविधा पुरवली जाणार आहे.
येत्या सोमवारपासून ऑन स्पॉट वॉक इन लसीकरण सुविधा सुरू केली जाणार आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार यादिवशी विविध गटातील लाभार्थ्यांना राहत्या प्रभागाच्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेता येणार आहे.
दरम्यान मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडर मधून एका पुरवठादारानं माघार घेतली आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर लस मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर जगातील ६ सिस्टर सिटीजननं मुंबई महापालिकेला कोरोना लस पुरवावी, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा