कमी खर्चात स्तन प्रत्यारोपण करणं पडलं महागात

थायलंडमध्ये राहणाऱ्या ४४ वर्षीय महिलेला खाजगी रूग्णालयात सवलतीच्या दरात स्तन प्रत्यारोपण करणं चांगलंच महागात पडलं आहे. सिलिकॉन इंजेक्शन देऊन करण्यात आलेल्या या सर्जरीमुळं महिलेला जीव गमवावा लागला असता, मात्र मुंबईतील वोक्हार्ट रूग्णालयात तिच्यावर वेळीच उपचार झाल्यानं तिचा जीव वाचला.

स्तनांच्या आकारात वाढ

थायलंड इथं स्थायिक असणाऱ्या ४४ वर्षीय महिलेनं एका खाजगी रूग्णालयात कमी दरात स्तन प्रत्यारोपणं केलं होते. त्यानंतर ४ महिन्यांनी तिच्या स्तनाच्या आकारात वाढ होऊन त्यावर लाल चट्टे आल्याचं लक्षात आलं. त्यामुळे ती त्वरीत संबंधित क्लिनिकमध्ये गेली, परंतु ते क्लिनिक बंद असून त्या ठिकाणचे डॉक्टरही गायबही झाल्याचं तिच्या लक्षात आलं. यानंतर त्या महिलेनं मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालयात उपचाराकरीता धाव घेतली.

सिलिकाॅन इंजेक्शन

वोक्हार्ट रूग्णालयातील ऑनकोलॉजीस्ट डॉ. मेघल संघवी यांनी तातडीनं तिच्यावर उपचार सुरू केले. उपचारावेळी त्या महिलेचे स्तन प्रत्यारोपण न करता तिला सिलिकॉन इंजेक्शन दिल्याचं उघड झालं. सिलिकॉन इंजेक्शन घातक असून यामुळं तिला कॅन्सर होण्याची शक्यता होती. या इंजेक्शनमुळं प्रसंगी तिला जीवही गमवावा लागला असता.

धोका टळला

तिच्या स्तनांमधील सिलिकॉनच्या लहान तुकड्यांना काढून टाकणं शक्य नसल्यानं डॉक्टरांनी तिच्या स्तनांची पुननिर्मिती करण्याचा निर्णय घेतला. यामुळं तिच्या जीवाला असलेला धोका पूर्णपणं टळला असून ती सुखरूप पुन्हा आपल्या मायदेशी परतली आहे.


हेही वाचा-

पालकांनो, घाबरू नका, गोवर-रूबेला लसीकरण करा- महापालिका

झेन हॉस्पिटलमध्ये ब्रॉन्कोस्कोपने छातीतून काढली पिन


पुढील बातमी
इतर बातम्या