Advertisement

पालकांनो, घाबरू नका, गोवर-रूबेला लसीकरण करा- महापालिका

महापालिका आणि सरकारच्या आरोग्य विभागाकडून संपूर्ण काळजी घेत ही मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत ४ लाख मुलांचं यशस्वीरित्या लसीकरण करण्यात आलं आहे. त्यामुळं पालकांनी न घाबरता पुढं येऊन लसीकरणाद्वारे मुलांना आजारापासून दूर ठेवण्याचं आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डाॅ. पद्मजा केसकर यांनी केलं आहे.

पालकांनो, घाबरू नका, गोवर-रूबेला लसीकरण करा- महापालिका
SHARES

केंद्र सरकारच्या मिझल-रूबेला (एमआर) लसीकरण मोहिमेला मुंबईत २७ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली आहे. या मोहिमेंतर्गत मुंबई महापालिकेच्या आणि खासगी शाळेतील सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांना आतापर्यंत ही लस देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डाॅ. पद्मजा केसकर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. सोबतच पालकांनी घाबरून न जाता मुलांना गोवर-रूबेलाचं लसीकरण करून घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला.


मुलांना आजारापासून दूर ठेवा

'एमआर' लसीकरणानंतर मुलांना उलटी आणि तापासारखा त्रास होत असल्यानं पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मात्र पालकांनी अजिबात घाबरू नये, हे लसीकरण पूर्णत: सुरक्षित आहे. महापालिका आणि सरकारच्या आरोग्य विभागाकडून संपूर्ण काळजी घेत ही मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत ४ लाख मुलांचं यशस्वीरित्या लसीकरण करण्यात आलं आहे. त्यामुळं पालकांनी न घाबरता पुढं येऊन लसीकरणाद्वारे मुलांना आजारापासून दूर ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.


३ टप्प्यांमध्ये मोहीम

केंद्र सरकारने २०२० पर्यंत गोवर आजारचं समूळ उच्चाटन करण्याचं उद्दीष्ट ठेवत एमआर लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. मुंबईत या मोहिमेला २७ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली. एकूण ३ टप्प्यांमध्ये मुंबईत ही मोहीम राबवली जात असून पहिल्या टप्प्यात खासगी-सरकारी-महापालिका शाळांमध्ये लसीकरणाची मोहीम सुरू आहे. या लसीकरणाबाबत पालकांना माहिती देत त्यांच्या जनजागृती करण्याकरता सर्व शाळांमध्ये पालक-शाळा-आरोग्य अधिकारी अशा बैठका घेण्यात आल्या आहेत. तरीही अनेक पालकांमध्ये 'एमआर' लसीकरणाबाबत भीती आहे.


लसीकरणानंतर त्रास

'एमआर' लसीकरणानंतर मुलांना उलटी होत असून ताप येत असल्याच्या तक्रारी आहेत. तर सोशल मीडियावर यासंबंधीच्या अनेक बाबी व्हायरल होत आहेत. त्यामुळे पालकांची भीती वाढत असून अनेक पालक या लसीकरणाला नकार देताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेनं पालकांची ही भीती घालवण्याकरीता पुन्हा एकदा पालकांशी चर्चा करण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी पुन्हा शाळांमध्ये बैठका घेत पालकांची भीती दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही डाॅ. केसकर यांनी सांगितलं आहे.


शोधून काढत लस

महापालिकेकडून लवकरच लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात करण्यात येणार आहे. या टप्प्यात बालवाड्यांमधील मुलांना 'एमआर' लसीकरण केलं जाणार आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात प्रत्येक घरात जात ० ते १५ वयोगटातील ज्या मुलांनी 'एमआर' लस घेतली नसेल त्यांना शोधून काढत त्यांना लस दिली जाणार असल्याचंही डाॅ. केसकर यांनी सांगितलं आहे. 'एमआर' लस घेणाऱ्या मुलांना विशिष्ट खूण केली जात असून त्यांना कार्डही दिलं जात आहे. त्यामुळे लस न घेतलेल्या मुलं शोधण सहज सोपं होणार असल्याचंही पालिकेचं म्हणणं आहे.


आजाराचं समूळ उच्चाटन

गोवर हा अत्यंत घातक आणि संसर्गजन्य असा आजार आहे. लहान मुलांना होणारा हा घातक आजार दरवर्षी देशात ५० हजार मुलांचा जीव घेतो. त्यामुळेच या जीवघेण्या आजाराचं समूळ उच्चाटन कऱण्यासाठी एमआर लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तेव्हा या घातक आजारापासून आपल्या मुलांना वाचवण्यासाठी ही लस प्रत्येक पालकांनी पाल्याला द्यावी. यात घाबरण्यासारखं काही नसून ही लस पूर्णत: सुरक्षित असल्याचा पुनरूच्चारही डाॅ. केसकर यांनी केला आहे.



हेही वाचा-

मुंबईत दर दिवशी ३ नागरिकांना डेंग्यूची लागण

२७ नोव्हेंबरपासून गोवर-रूबेला लसीकरण मोहीम



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा