मुंबईत दर दिवशी ३ जणांना डेंग्यूची लागण होत असून जवळपास ३७ संशयित महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल झाल्याची धक्कादायक माहिती अधिकार कायद्यांतर्गत आरटीई उघडी झाली आहे. त्याशिवाय गेल्या ३५ महिन्यांत
३८ मुंबईकरांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी समोर आणली आहे.
काही दिवसांपूर्वी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी गेल्या ३ वर्षांत मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील डेंग्यूच्या रुग्णाची माहिती महापालिकेकडे मागितली होती. त्यनुसार मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खात्याने अनिल गलगली यांना २०१६, २०१७ आणि ११ नोव्हेंबर २०१८ पर्यंत एकूण ३५ महिन्यांची माहिती दिली.
वर्ष | संशयित रुग्ण | आढळलेले रुग्ण | मृत्यू |
---|---|---|---|
२०१६ | १३ हजार २१३ | १ हजार १८० | ०७ |
२०१७ | १२ हजार ९१३ | १ हजार १३४ | १७ |
११ नोव्हेंबर २०१८ पर्यंत | १३ हजार १३८ | ९४५ | १४ |
या आकडेवरीवरून प्रत्येक दिवशी ३७ संशयित रुग्ण आढळले असून त्यातील ३ रुग्णांना डेंग्यू असल्याचं महापालिकेच्या रुग्णालयात सिद्ध झालं आहे. त्याशिवाय गेल्या ३५ महिन्यांत ३८ मुंबईकरांचा डेंग्यूने मृत्यू झाला असून प्रत्येक महिन्याला सरासरी १ रुग्ण डेंग्यूने मृत्यू पावतो.
सार्वजनिक आरोग्य खात्याने जनजागृती करणे आवश्यक आहे, ती योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे सामान्य नागरिकांना डेंग्यूच्या बाबतीत सरळ आणि स्पष्ट माहिती नसल्याचा दावाही अनिल गलगली यांनी केला आहे.