बोरीवली, दहिसर, कांदिवली आणि मालाडमध्ये COVID 19 च्या रुग्णांमध्ये वाढ

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुंबईतल्या पालिका अधिकाऱ्यांच्या चिंतेत अधिक भर पडत आहे. सोमवारपासून मिशन बिगिन अगेन या मोहिमे अंतर्गत नॉन कंन्टेंमेंट झोनमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले.

अर्थात सोशल डिस्टंसिंग पाळण्याच्या अटिवर निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. सामाजिक अंतर राखत समुद्र किनारी, मैदानात चालणे, धावणे, जॉगिंग करणं आदी गोष्टींना परवानगी देण्यात आली. सोशल डिस्टंसिंगसोबतच तोंडाला मास्क देखील बंधनकारक करण्यात आला.

सोमवारी, मुंबईतील खासगी कार्यालयांमध्ये १०% पर्यंत कर्मचारी किंवा जास्तीत जास्त १० कर्मचाऱ्यांना काम करण्याची परवानगी देण्यात आली, तर उर्वरित लोकांना घरातूनच काम करण्याचा सल्ला देण्यात आला.

मंगळवारी मुंबईत एकूण ५८ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. शहरातील मृतांचा आकडा १ हजार ६३८  वर पोहोचला आहे. मुंबईत सध्या कोरोनाव्हायरसच्या एकूण सक्रीय रुग्णांची संख्या ५१ हजार ११० आहे. त्यात मंगळवारी १ हजार ०१५ नव्या रुग्णांची भर पडली.

मंत्रालयाच्या सूत्रांनी चिंता व्यक्त केली आहे की, लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते. चीन आणि दक्षिण कोरिया सारख्या हॉटस्पॉट असलेल्या देशांमध्ये देखील असाच प्रकार घडला. पण जर गोष्टी नियंत्रणाखाली आल्या तर जूनच्या अखेरीपर्यंत हे संपुष्टात येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

तथापि, बोरिवली, दहिसर, कांदिवली आणि मालाड या वॉर्डमध्ये परिस्थिती दिलासादायक नाही. यासंदर्भात नुकताच अहवाल आला. मुंबईत व्हायरसचा सरासरी विकास दर २.९३ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. पण या वॉर्डमध्ये अजूनही चिंतादायक वातावरण आहे. हे प्रभाग आर (दक्षिण), आर (उत्तर) आणि पी (उत्तर) अंतर्गत येतात.

पालिका अधिकाऱ्यानं सांगितलं की, “आर (दक्षिण), आर (उत्तर) आणि पी (उत्तर) या तीन वॉर्डमध्ये रुग्ण बरे होण्याचं प्रमाण २५ ते ३३ टक्क्या दरम्यान आहे. हे प्रमाण पाहता गेल्या काही दिवसांत या वॉर्ड्समध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याचं दर्शवतो.”

आर दक्षिण-प्रभागचे (कांदिवली) सहाय्यक नगरपालिका आयुक्त संजय कुऱ्हाडे म्हणाले की, झोपडपट्टी भागात कोरोनाचे नवे रुग्ण अधिक सापडत आहेत. नव्या रुग्णांच्या बाबतीत कुठलं स्वतंत्र धोरण राबवलं जात नाही आहे. तर आधीपासूनच लागू असलेलं धोरण जसं की संशयितांची चाचणी करणं आणि त्यांना क्वारंटाईन करणं या पद्धतीनंच प्रयत्न केले जात आहेत.


हेही वाचा

Exclusive : कोरोना रुग्णांसाठी चक्क कार्डबोर्डचा बेड, सुटकेससारखा होतो फोल्ड

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुढं ढकललं, मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

पुढील बातमी
इतर बातम्या