वाडीया रूग्णालयात बाल कर्करूग्णांनी साकारला ‘चॉकलेट बाप्पा’

प्रत्येक जण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं स्वागत वेगवेगळ्या पद्धतीनं करत असतो. गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वांत जास्त उत्सुकता असते ती म्हणजे बच्चे कंपनीला...बाप्पाचं स्वागत करण्यासाठी ही लहान मुलं नेहमीच आघाडीवर असतात. पण कर्करोग झालेल्या अनेक लहान मुलांना इच्छा असूनही आजारपणामुळे हा सण उत्साहाने साजरा करता येत नाही. मात्र, या मुलांना बाप्पाचं दर्शन घडाव यासाठी परळ येथील वाडीया रूग्णालयातील बालकर्करूग्णांनी एका अनोख्या पद्धतीनं गणरायाचं स्वागत केलं आहे.

रुग्णालयातील लहान मुलांनी स्वतःच्या हातांनी चॉकलेटचा बाप्पा साकारला आहे. तसंच, चॉकलेटच्या गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश मुलांनी दिला आहे. या गणेशोत्सवामुळं स्वतःच्या वेदना विसरून काही क्षणासाठी मुलांच्या चेहऱ्यांवर हसू फुललं होतं.

खेळण्याच्या वयात कर्करोगाचं निदान झाल्यानं या मुलांना केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी यांसारख्या वेदनादायी उपचारपद्धतीतून जावं लागतं. याशिवाय, अन्य राज्यातून रूग्ण उपचारासाठी मुंबईत येत असल्यानं उपचार होईपर्यंत ते इथंच राहतात. त्यामुळं कोणताही सण त्यांना कुटुंबियांसह साजरा करता येत नाही. हे लक्षात घेत बाल कर्करूग्णांना गणेशोत्सवाच्या सणात सहभागी होता यावं, यासाठी वाडीया रूग्णालयात गणेशमुर्तीची स्थापना करण्यात आली आहे.

हेही वाचा - दादर, माहीम, धारावीकरांसाठी 'फिरता कृत्रिम तलाव आपल्या दारी'

'यंदाच्या वर्षी कोरोनामुळं सर्वत्र अत्यंत साध्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणं आम्ही सुद्धा रूग्णालयात गणेशाची स्थापना केली आहे. सध्या रूग्णालयात अनेक बाल कर्करूग्णांवर उपचार सुरू आहेत. दुरहून रूग्ण उपचारासाठी येत असल्यानं ते या ठिकाणीच राहतात. या लहान मुलांना गणेशोत्सव साजरा करता येत नाही. पण आजारानं कोलमडून न जाता त्यांना ध्यैर्याने तोंड देण्यासाठी खास या मुलांसाठी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बाल कर्करूग्णांनी चॉकलेट पासून बाप्पाची मूर्ती साकारली आहे', असं वाडिया रूग्णालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी म्हटलं.

बाप्पासाठी सुरेख असा देखावा ही साकारण्यात आला आहे. यात मुलांनी पर्यावरणासंबधी अनेक चित्र काढले आहेत. यासाठी गणपतीसाठी मोदकाचा नैवेदय ही ठेवण्यात आला आहे. हा सण साजरा करताना अनेक मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता. तसंच, या मुलांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून, त्यांना आयुष्यभर लक्षात राहातील अशा संस्मरणीय आठवणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही डॉ. बोधनवाला यांनी म्हटलं.


हेही वाचा -

लाॅकडाऊन पूर्णपणे काढून टाका! मनसेच्या सर्वेक्षणाचा कौल जाहीर

सप्टेंबरमध्ये लोकल सुरू होण्याची शक्यता


पुढील बातमी
इतर बातम्या