ठाण्यात पार पडला कोरोना लसीकरणाचा ड्राय रन

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने घोडबंदर रोडवरील रोझा गार्डनिया आरोग्य केंद्र येथे कोविड १९ लसीकरणाचा यशस्वी ड्राय रन शुक्रवारी घेण्यात आला. यावेळी महापौर नरेश गणपत म्हस्के, उपमहापौर पल्लवी पवन कदम, सभागृह नेते अशोक वैती, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्यासह स्थानिक नगरसेवक आणि कर्मचारी यांनी डमी रुग्ण म्हणून सहभाग घेतला.

लसीकरणाची पूर्व तयारी म्हणून हा ड्राय रन घेण्यात आला असून या ठिकाणी लसीकरणासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये लसीकरणासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी प्रतिक्षा कक्ष, नोंदणी कक्ष आणि लसीकरण कक्ष निरीक्षण कक्ष आदी सुविधा निर्माण करण्यात आला आहे. या ड्राय रनसाठी रोझा गार्डनिया आरोग्य केंद्रावर काम करणाऱ्या एकूण २५ कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. 

लसीकरणासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने शासनाच्या नियमांचे पालन करुन संपूर्ण तयारी केली आहे. लसीकरणासाठी महापालिका सज्ज असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी कोविड लसीकरणाच्या ड्राय रनच्या वेळी स्पष्ट केले.

लसीकरण मोहिमेतंर्गत पहिल्या टप्प्यात आरोग्य अधिकारी कर्मचारी, पोलीस विभाग, ५० वर्षावरील नागरिक, अतिजोखीम गटातील रुग्ण यांचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र शासनाकडून वेळोवळी प्राप्त होणाऱ्या सूचनांनुसार महापालिकेमार्फत अंमलबजावणी केली जाईल,असे आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी नमूद केले तसेच उद्यापासून महापालिका कक्षातील १५ आरोग्य केंद्रावर ड्राय रन घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, लसीकरण करण्यात येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांची माहिती केंद्र शासनाच्या को-विन(CO-WIN) या ॲपवर अद्ययावत करण्यात आली असून यामध्ये आरोग्य कर्मचारी, डॅाक्टर्स आणि प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.


हेही वाचा -

पोलिस भरतीचा जीआर अवघ्या काही तासात रद्द

MPSC च्या परीक्षा जाहीर; शुक्रवारी तारखा जाहीर होण्याची शक्यता


पुढील बातमी
इतर बातम्या