कोरोनाच्या भितीने चिकन किलोला १० रुपयांवर

कोरोना विषाणूचा (coronavirus) विळखा जगभरात वाढत चालला आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. या जीवघेण्या आजाराने संपूर्ण देश धास्तावला आहे. मात्र, काही अफवांमुळे राज्यातील पोल्ट्री व्यवसाय आता बुडण्याच्या मार्गावर आहे. चिकनमधून करोना होतो, अशी अफवा पसरली आहे. यामुळे लोकांनी चिकन खाणं बंद केलं आहे. परिणामी चिकनचे दर कोसळले आहेत. प्रती किलोला चिकनचा (chiken) दर आता अवघ्या १० रुपयांवर आला आहे. त्यामुळे पोल्ट्री (Poultry) व्यावसायिक आणि चिकनविक्री करणारे दुकानदार धास्तावले आहेत. 

राज्यभरात चिकनचे दर कोसळल्याने पोल्ट्री व्यावसायिकांच्या डोळ्यात पाणी तरळलं आहे. त्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. अमरावती, नाशिक, कोल्हापूर, उस्मानाबाद बीड या जिल्ह्यात १०  रुपये दराने एक किलोची कोंबडी मिळत असल्याच्या पाट्याही लागल्या आहेत. सोशल मीडियावर चिकन १० रुपये अन् मास्क १०० रुपये असे विनोदही व्हायरल झाले आहेत. दरम्यान, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी करोना व्हायरसची लागण चिकन खाल्ल्यामुळे होत नाही असं स्पष्ट केलं.

कोरोना विषाणूच्या भीतीमुळे पालघरमधील हॅचरी मालकाने ९ लाख उबलेली अंडी आणि पावणेदोन लाख कोंबडीची पिल्ले जमिनीत जमिनीत नष्ट केली आहेत. नव्याने निर्माण केलेल्या या पिल्लांना खाद्य देण्यासाठी पैसे नसल्याने ती खड्ड्यात पुरावी लागली आहेत. डॉ. सुरेश भाटलेकर यांच्या  पालघर जिल्ह्यात दोन हॅचरी आणि ३५ पोल्ट्री  आहेत.  त्यांपैकी दहा शेडमध्ये ९० हजार कोंबड्या विक्रीसाठी तयार आहेत. मात्र, बाजारात उठाव नसल्याने त्यांच्यापुढे मोठे संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यातील या हॅचरी कुक्कुटपालन व्यवसायिकांनी तीनशे टन इतके चिकन शीतगृहामध्ये ठेवले आहे. त्यासाठी लागणारे ब्लास्ट फ्रिजर आणि कूलर याकरिता भाडे असे किमान १० ते १५ रुपये प्रतिकिलो अतिरिक्त खर्च या व्यवसायिकांना उचलावा लागत आहे.

चिकन खाल्ल्याने कोरोनाची लागण होते हा लोकांमध्ये पसरलेला गैरसमज दूर करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन विभागातर्फे लवकरच चिकन फेस्टिव्हलचं आयोजन केले जाणार आहे. नागपूर आणि मुंबईत चिकन फेस्टिव्हल भरवला जाणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी जाहीर केले.


हेही वाचा -

Coronavirus Update: कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे महापालिका घेणार खासगी रुग्णालयांची मदत

मालमत्ता कर थकवणाऱ्या ३,५६४ मालमत्तांवर पालिकेची कारवाई


पुढील बातमी
इतर बातम्या