सामान्य रुग्णांचे महापालिका रुग्णालयांमध्ये हाल

मुंबईच्या अनेक भागात अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयात आणि खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या रुग्णालयांमध्ये विशेषत: कोरोनाच्या रुग्णांवरच उपचार केले जात असून सामान्यांकडं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळं महापालिकेनं हळुहळू रुग्णालयांमध्ये इतर आजारानं ग्रस्त असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यास सुरूवात केली आहे. असं असलं तरी महापालिकेच्या केईएम, शीव व नायर रुग्णालयांतही कोरोनाव्यतिरिक्त सामान्य रुग्ण फारसे येत नसल्याचे दिसून येते.

अत्यावश्यक शस्त्रक्रियांचे रुग्ण वगळता अपवादानेच रुग्ण पालिका रुग्णालयांत येत आहेत. ६ महिने झाले तरी खासगी दवाखाने, छोटी-मोठी रुग्णालये अजूनही बंदच असल्यानं कोरोनाव्यतिरिक्त इतर आजार असलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. गोरगरिबांसाठी आधार असलेल्या केईएम, शीव व नायर रुग्णालयांतही अत्यावश्यक रुग्णवगळता अन्य रुग्णांवर अभावानेच उपचार केले जात आहेत.

अजूनही केईएम रुग्णालयात २२५० खाटा असून त्यापैकी आठ विभागांतील खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्याचं समजतं. तसंच, ३ विभाग परिचारिकांसाठी राखीव आहेत. सध्यस्थितीत रुग्णालयात १७० करोना रुग्णांवर उपचार सुरू असून लक्षणं नसलेले परंतु विविध गंभीर आजार असलेले ७० रुग्ण दाखल आहेत.

के.ई.एम. रुग्णालयात १२०० खाटा सामान्य रुग्णांसाठी असून सध्या ४०० रुग्ण दाखल झाल्याची माहिती मिळते. सायन रुग्णालयात एरवी बाह्यरुग्ण विभागात सुमारे साडेसहा हजार रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र सध्या १५०० रुग्ण उपचारासाठी येत आहेत. या रुग्णालयात १४५० खाटा असून त्यापैकी ३०० कोरोनासाठी राखीव आहेत. महापालिकेनं नायर रुग्णालय हे कोरोना रुग्णालय म्हणूनच घोषित केलं होतं. १२०० खाटा असलेल्या रुग्णालयात आता ६०० खाटा कोरोना तर ६०० खाटा सामान्य रुग्णांसाठी आहेत. 


हेही वाचा -

लाॅकडाऊन पूर्णपणे काढून टाका! मनसेच्या सर्वेक्षणाचा कौल जाहीर

कुख्यात गुंड युसुफ बचकानाच्या तीन हस्तकांना अटक, कर्नाटकमध्ये केली विकासकाची हत्या


पुढील बातमी
इतर बातम्या