दिलासादायक! तब्बल 'इतक्या' कॅन्सरग्रस्तांची कोरोनावर मात

मुंबईसह राज्यभरातील सामान्य नागरिकांना कोरोनानं चांगलंच घेरलं आहे. परंतु, कोरोनानं सामान्यांसह कॅन्सरग्रस्तांना आपल्या जाळ्यात ओढलं. मात्र, या कॅन्सरग्रस्तांनी एका भयानक आजारावर मात करताना दुसऱ्या जीवघेण्या आजारालाही धुडकावून लावलं आहे. कॅन्सरवर उपचार सुरू असलेल्या १७८ रुग्णांना कोरोना झाल्यानं त्यांना महापालिकेतर्फे वरळी येथील एनएससीआय डोम केंद्रामध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यापैकी १२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

कॅन्सर रुग्णांमध्ये रोगप्रतिकारशक्ती खालावलेली असते. त्यामुळं कोरोनाची लागण झाल्यानंतर अशा रुग्णांमध्ये या संसर्गामुळं कोणतीही गुंतागुंत उद्भवू नये यासाठी पालिकेतर्फे वरळी येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया इथं विकसित केलेल्या डोम कोरोना काळजी केंद्रामध्ये या कॅन्सर रुग्णांची व्यवस्था करण्यात आली.

टाटा कॅन्सर रुग्णालयातून या केंद्रात आलेल्यांमध्ये २ वर्षांच्या लहान मुलांपासून ७८ वर्षांच्या वयोवृद्ध व्यक्ती तसेच वैद्यकीय उपचारासाठी मुंबईत आलेल्या परदेशी व्यक्तीचाही समावेश होता. ५० वर्षांवरील या १७८ बाधित कॅन्सर रुग्णांपैकी १२६ जण कोरोनामुक्त झाले आहे. यामधील कोणत्याही रुग्णाला कोरोनामुळं जीव गमवावा लागला नाही. यांच्यासोबत असणाऱ्या १४पैकी १० नातेवाईकांवर उपचार करून त्यांनाही घरी सोडण्यात आले आहे.

राज्यात रविवारी १२० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात मुंबईतील ६९ रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील एकूण कोरोना मृत्यूची संख्या ३ हजार ९५० इतकी झाली आहे. गेल्या २४ तासात राज्यात ३ हजार ३९० नवीन रुग्णांचं निदान झालं असून, महाराष्ट्रात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ०७ हजार ९५८ इतकी झाल्याची माहिती राज्य सरकारनं दिली आहे.

रविवारी दिवसभरात १ हजार ६३२ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले आहेत. आजपर्यंत एकूण ५० हजार ९७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रविवारी एकूण ५३ हजार १७ रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४७.२ टक्के इतके आहे. राज्यातील मृत्यू दर ३.६५ टक्के आहे. सध्या राज्यात ५ लाख ८७ हजार ५९६ लोक घरातच विलगीकरणात आहेत. तर २९ हजार ६४१ लोक संस्थात्मक विलगीकरणात आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


हेही वाचा -

सोमवारपासून ऑनलाइन शिक्षण सुरू; विद्यार्थी, पालकांमध्ये उत्साह

गुड न्युज: मुंबई लोकल ट्रेन अखेर सुरू, पण..


पुढील बातमी
इतर बातम्या