शिवाजी पार्कमधली इमारत सील, आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे भितीचं वातावरण निर्माण होत आहे. त्यात अशी बातमी समोर येत आहे की, दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील एका ६० वर्षीय वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.  

शिवाजी पार्क इथल्या एका इमारतीत राहणाऱ्या ६० वर्षीय वृद्ध व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ही इमारत सील करण्यात आली आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना घरातच क्वारंटाईन करण्यात आलं आहे. पॉझिटिव्ह रुग्णाची प्रभादेवी इथं प्रिंटिंग प्रेस आहे. या प्रिंटिंग प्रेसमध्ये वरळी कोळीवाड्यातील एक व्यक्ती काम करत होता. त्याच्यामार्फत कोरोना झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण पॉझिटिव्ह रुग्णाची कुठल्या प्रकारची ट्रॅव्हल हिस्ट्री नाही.  

दरम्यान नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ५३७ वर पोहोचली आहे. राज्यामध्ये रात्रभरात ४७ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. यापैकी २८ रुग्ण मुंबईतील आहेत. मुंबईत नवे २८ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईत रुग्णांची संख्या ३०६ वर गेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये रात्रभरात २८ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर ठाण्यामध्ये कोरोनाचे १५ नवे रुग्ण समोर आले आहेत. अमरावतीमध्ये १, पुण्यात २ तर पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाच्या १ रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. या वाढत्या आकड्यांमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

शुक्रवारी दिवसभरात मुंबईत ४३ कोरोनाग्रस्त दाखल झाले. त्यामुळे मुंबईतल्या कोरोनाबाधितांची संख्या २७८ झाली आहे. पुण्यात आज ९ रुग्ण सापडले तर नवी मुंबईत ८ कोरोनाग्रस्त सापडले. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत २६ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी मुंबईतील १९ जणांचा समावेश आहे.


हेही वाचा

लॉकडाऊन : ड्रोनच्या मदतीनं शूट केला मुंबईतील 'टोटल सन्नाटा', एकदा बघाच

... तर देश जाऊ शकतो १ आठवडा अंधारात!

पुढील बातमी
इतर बातम्या