coronavirus : धारावीत तिसरा बळी, ७० वर्षीय महिलेचा मृत्यू

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर जास्त वाढत आहे. सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण हे मुंबईतच आढळले आहेत. त्यामुळे सर्वांच्याच चिंतेत अधिक भर पडली आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीत कोरोना पसरत आहे. कोरोनामुळे धारावीत आणखी एका महिलेचा मत्यू झाल्याचं समोर येत आहे. धारावीत आतापर्यंत हा तिसरा कोरोनाबळी आहे.

महिलेचा मृत्यू

गुरुवारी केईएम रुग्णालयात दाखल असलेल्या ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ती धारावीच्या कल्याणवाडी परिसरात राहणारी होती. मुंबईत वरळी, प्रभादेवीनंतर आता धारावी Coronavirus चा हॉटस्पॉट ठरत आहे. धारावीत दाटीवाटीच्या घरांमुळे हा व्हायरस वेगानं पसरत असल्याची भिती वर्तवली जात आहे.

धारावीत 'इतके' रुग्ण

मार्चच्या शेवटी धारावीत पहिला रुग्ण सापडल्याची बातमी आली होती. आता धारावीत १४ कोरोनारुग्ण आहेत. आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. धारावी रेड झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. १० भागांमध्ये भाजीविक्रीसुद्धा बंद आहे. ये-जा करणारे रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.

धारावीतील तिसरा बळी

आतापर्यंत धारावीत सापडलेल्या १४ रुग्णांपैकी चौघे डॉ.बलिगा नगर परिसरात राहणारे आहेत. त्यातल्या एकाचा मृत्यू झाला. सोशल नगर परिसरात राहणाऱ्या एका ७० वर्षीय व्यक्तीचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यानंतर गुरुवारी कल्याणवाडीतील महिला या विषाणूमुळे मृत्युमुखी पडली.

हाय रिस्क रुग्ण

धारावीत सापडलेले कोरोनारुग्ण हे बहुतेक हाय रिस्क म्हणजे धोका असलेल्या वयातले आहेत. आतापर्यंत वैभव अपार्टमेंट, मुकुंद नगर, मदिना नगर, धनवाडा चाळ, मुस्लीम नगर, सोशल नगर, जनता सोसायटी, कल्याणवाडी या धारावीच्या भागांमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण सापडले आहेत. धारावीचा हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.

राजेश टोपे काय म्हणाले?

राज्यात रुग्णांची संख्या वाढत असली, तरी दुसरीकडे रुग्ण बरे होऊन त्यांना घरी देखील सोडण्यात येत आहे. आतापर्यंत १२० कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे, हे सांगतानाच महाराष्ट्रात अजूनही कोरोना तिसऱ्या टप्प्यात पोहोचलेला नाही. याबाबत आयसीएमआर (ICMR) आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) तसं घोषित केलं जातं, असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी केला.

महाराष्ट्र राज्यातील कोरोना बाधित संख्या 1297 झाली आहे. यामध्ये मुंबई 143, पुणे 03,पिंपरी चिंचवड 02, यवतमाळ 01, औरंगाबाद 03, ठाणे 01,नवी मुंबई 02, कल्याण-डोंबिवली 04,मीरा-भाईंदर 01,वसई विरार 01,सिंधुदुर्ग 01,अशी 162 रुग्णांची वाढ झाली आहे.


हेही वाचा

कोरोनाचा मृत्यूदर महाराष्ट्रात दुप्पट

रॅपिड टेस्टिंगसाठी दक्षिण कोरियामधून 1 लाख किट्स

पुढील बातमी
इतर बातम्या