चिंताजनक, तिसऱ्या लाटेत डेल्टा प्लस व्हेरिएंटचा अधिक धोका

सरकारनं ठरवलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन न झाल्यास येत्या एक-दोन महिन्यात राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार. ही शंका राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या कोरोना टास्क फोर्सनं व्यक्त केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत आढावा घेण्यासाठी बुधवारी बैठक झाली. यात कोरोनाचा “डेल्टा प्लस” म्हणजेच AY.1 व्हेरिएंटमुळे राज्यात तिसरी लाट येण्याचा धोका मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आला आहे.

तिसऱ्या लाटेचा धोका पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जेष्ठ डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना औषध आणि आरोग्य उपकरण तयार ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागात औषधांचा साठा करणं आणि आरोग्य सुविधा पुरवण्यावर जोर दिला.

राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुसऱ्या लाटेत 'डेल्टा वेरिएंट'मुळे रुग्णांची संख्या वाढली होती. आता तिसऱ्या लाटेत ही संख्या अजून वाढू शकते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत १९ लाख आणि दुसऱ्या लाटेत जवळपास ४० लाख रुग्णांची नोंद झाली. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, तिसऱ्या लाटेत ८ लाख अॅक्टिव्ह रुग्ण असू शकतात. त्यातील दहा टक्के लहान मुले असतील.

बेंगरुरुच्या विक्रम हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, डेल्टाचा अधिक परिणाम रोगप्रतिकारशक्तीवर होतो. यामुळे रुग्णांमध्ये म्युकोरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगस होण्याचा धोका वाढतो. कर्नाटकात सुमारे ४००-५०० रूग्णांना म्यूकोर्मिकोसिस झाल्याचं आढळलं आहे.”

विक्रम हॉस्पीटलमधील सल्लागार डॉ. श्रीनिवास म्हणाले की, “वेळेवर उपचार न मिळाल्यास म्युकोरमायकोसिस अधिक वेगानं पसरतो. त्यामुळे मृत्यू होण्याचा धोका देखील अधिक असतो. याचा सर्वाधित धोका मधुमेह असणाऱ्यांना, इतर कुठला आजार असणाऱ्यांना आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होणारी औषधं घेण्यांना असतो.”

विक्रम हॉस्पीटलमधील डॉ. प्रमोद म्हणाले की, “जर रुग्ण वेळेवर वैद्यकीय मदत घेत असतील तर म्युकरमायकोसिस बरा होऊ शकतो. या रोगाची प्रारंभिक अवस्था तीन आठवडे असते. शस्त्रक्रियेद्वारे बाधित भागातून संक्रमण साफ केले जाते. यासोबतच अँफोटेरिसिन-बीच्या रूपात बुरशीविरोधी औषध घेणं आवश्यक आहे. त्यामुळे लक्षणं कळून येताच ईएनटी तज्ञाचा सल्ला घ्या."

ऑगस्ट- सप्टेंबर पासून देशाला 42 कोटी लसी मिळताहेत अशी माहिती मिळते आहे. त्यामुळे लसीकरण वेगाने सुरु होऊन महाराष्ट्रालाही त्याचा फायदा होईल. लसीकरण हा या लढाईत महत्वाचा भाग असला तरी आरोग्य विषयक नियमांचे पालन करणे, मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे हे अत्यावश्यक आहे.


हेही वाचा

भिकारी, विक्रेतांसाठी जैन मंदिराचा पुढाकार, ओळखपत्रांशिवाय दिली लस

शाब्बास धारावीकर! सलग दुसऱ्या दिवशी शून्य रुग्णसंख्या

पुढील बातमी
इतर बातम्या