फक्त 15 दिवसांत मुंबईत डेंग्यूचे 1,963 रुग्ण!

ऑक्टोबर महिना सुरू झाला तरी परतीचा पाऊस कोसळतोय. त्यामुळे सकाळी 9 वाजताच दुपारी 12 वाजल्यासारखं ऊन पडतं. तर, भर दुपारी मुंबईकर अक्षरश: घामाघूम होतो. त्यात संध्याकाळी मध्येच पाऊस पडतो. त्यामुळे सध्या वातावरणात बरेच बदल होताना दिसत आहेत. या सततच्या बदलांमुळे मुंबईकर सध्या आजाराच्या विळख्यात सापडले आहेत.

यामुळे दिवसेंदिवस डेंग्यूच्या रुग्णांमध्येही भर पडत चालली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यातील 15 दिवसांत डेंग्यूचे 124 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय फक्त 15 दिवसांत डेंग्यूचे 1 हजार 963 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. शिवाय, सप्टेंबर महिन्यातील 15 दिवसांत डेंग्यूचे 164 रुग्ण आढळून आले होते. तर, फक्त 15 दिवसांत डेंग्यूचे 1 हजार 659 संशयित रुग्ण आढळून आले होते.

या बदलत्या वातावरणामुळे फक्त डेंग्यूचेच नाही, तर या 15 दिवसांत लेप्टोस्पायरोसिसचेही 12 रुग्ण आढळून आले आहेत. मलेरियाचे 287 रुग्ण आणि गॅस्ट्रोचेही 275 रुग्ण आढळून आले आहेत.

सध्या वातावरणात बरेच बदल होत आहेत. त्यामुळे आम्ही वारंवार नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करतोय. थोडा ताप जरी जाणवला तरी तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन सल्ला आणि उपचार घ्यावेत.

डॉ. मिनी खेत्रपाल, साथ-रोग नियंत्रण कक्ष प्रमुख


हेही वाचा -

पावसात भिजलात? आरोग्याची काळजी घ्याच!

पुढील बातमी
इतर बातम्या