Advertisement

पावसात भिजलात? आरोग्याची काळजी घ्याच


पावसात भिजलात? आरोग्याची काळजी घ्याच
SHARES

मंगळवारी पडलेल्या पावसाने पुन्हा एकदा २६ जुलैची आठवण करुन दिली. हे पाणी एवढं दूषित होतं की त्यामुळे अनेकांना विविध आजारांची लागण झाली होती. सध्या मुंबईत डेंग्यू, मलेरियासोबतच लेप्टोस्पायरोसिस हा आजारही मोठ्या प्रमाणात पसरतोय. त्यामुळे मंगळवारच्या पावसात भिजला असाल आणि तब्येत बिघडल्याचं वाटत असेल, तर त्वरीत डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्या.

लेप्टोस्पायरोसिस हा संसर्गजन्य आजार प्राण्यांपासून माणसांना होतो. या आजाराचा विषाणू जनावरांच्या लघवीतून दूषित पाण्यामार्फत पसरतो. हे दूषित पाणी माणसांचे डोळे किंवा त्वचेच्या संपर्कात आल्यास त्या व्यक्तीला लेप्टोस्पायरोसिसची लागण होऊ शकते. एकदा लेप्टोस्पायरोसिस झाला की त्याच्यावर उपचार करणं कठीण होतं.


लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे -

  • डोकेदुखी, ताप, सर्दी
  • स्नायूंचे दुखणे
  • अवयव निकामी होणे
  • अंतर्गत रक्तस्त्राव


ही सावधगिरी बाळगा

  • उकळलेले पाणी थंड करुन प्या
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका
  • प्रतिजैविकांचा डोस घ्यायच्या विचारात असाल डॉक्टरांचा सल्ला घ्या
  • अन्यथा तुमची प्रतिकारशक्ती कमी होईल
  • बाहेरून आल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुवा
  • वयस्कर किंवा लहान मुलांनी पाणी उकळून आणि गाळून प्या
  • ज्या व्यक्तींना पायाला जखम, शू बाईट किंवा मधुमेह असेल, त्यांनी थोडा जरी ताप जाणवला तरी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या
  • त्वचेची काळजी घ्या


औषध घ्या, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच

एकदा पावसाच्या पाण्यात अडकला असाल, तर एक वेळेस डॉक्सीसायक्लिन हे प्रतिजैविक तुम्ही घेऊ शकता. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच. पाण्यात काही दुखापत झाली असेल तर ४ दिवस हे प्रतिजैविक घ्या. त्यातही ताप येत असेल तर ७ दिवस हे प्रतिजैविक घ्या. तसंच, लेप्टोस्पायरोसिससह, डायेरिया, स्वाईन फ्लू, कोलरा, टायफॉईड हे आजार होण्याची शक्यता टाळता येणार नाही. त्यामुळे योग्य तो सल्ला आणि उपचार लोकांनी घ्यावा, असा सल्ला वरिष्ठ डॉक्टर आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी दिला.


महापालिकेचे आरोग्य शिबीर

पावसाने २९ ऑगस्टला हाहाकार माजवल्यानंतर मुंबई महापालिकेने गुरुवारपासून मुंबईभर आरोग्य शिबीर भरवण्याचा निर्णय घेतलाय. ज्या जागी मोठ्या प्रमाणात स्वाईन फ्लू, डेंग्यू किंवा मलेरिया, काविळीचे रुग्ण आढळले आहेत, अशा वॉर्डमध्ये ही शिबीरं भरवण्यात येणार आहेत. तसंच रविवारपासून या आरोग्य शिबिरांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचं महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत स्पष्ट केलं आहे.

आरोग्य शिबिरादरम्यान घरोघरी जाऊनही माहिती घेण्यात येईल. तापाचे, काविळीचे रुग्ण ज्या परिसरात सापडतील त्यांना त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं साथरोग नियंत्रण कक्षाच्या प्रमुख डॉ. मिनी खेत्रपाल यांनी सांगितलं. २४ वॉर्डातील २४ वैद्यकीय अधिक्षकांना यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत.


पाऊस पडल्यानंतर पाच दिवसांनी आजाराची लक्षणे दिसून येतील. यापूर्वी जिथे जास्त रुग्ण आढळून आले आहेत, अशा वॉर्डामध्ये आम्ही आरोग्य शिबीरं आयोजित करणार आहोत. डॉक्टर्स, आरोग्य संघटना, सॅनिटरी इंस्पेक्टर्स या सर्वांना आरोग्य शिबिराबाबत माहिती दिली आहे. औषधांचीही व्यवस्था केली आहे.
- डॉ. मिनी खेत्रपाल, साथ-रोग नियंत्रण कक्ष प्रमुख



हे देखील वाचा -

या ७ कारणांमुळे तुंबली मुंबई !



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा