Advertisement

या ७ कारणांमुळे तुंबली मुंबई !


या ७ कारणांमुळे तुंबली मुंबई !
SHARES

मुंबईकरांच्या मनात २६ जुलैच्या पावसाची भीती कायम असताना मंगळवारी २९ ऑगस्टच्या पावसाने मुंबईकरांच्या धैर्याची पुन्हा एकदा परीक्षा घेतली. नेहमीच घडाळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईला मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने अवघ्या काही तासांतच ठप्प केले. बघता बघता मुंबई महापूर आल्यागत वाहू लागली. सुदैवाने बुधवारी पाऊस थांबला, पाणी ओसरले आणि मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास टाकत पुन्हा स्वत:ला कामात जुंपून घेतले. पण मुंबई नेमकी का तुंबली? याचा विचार केलाय का? नसेल केला तर करा, किंबहुना आपल्यापैकी प्रत्येकाने तो करायलाच हवा आणि संबंधित यंत्रणांकडून उत्तर देखील मागायला हवे. 'मुंबई लाइव्ह'ने यापैकी ७ महत्त्वाच्या कारणांचा घेतलेला आढावा वाचा -


1) नालेसफाई अर्धवट, प्लास्टिक, थर्माकोलने गटारी तुंबलेल्या 

मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्लास्टिक आणि थर्माकोलने गटारी तुंबून जागोजागी पाणी साचल्याची कबुली दिली. यापूर्वी मे आणि जून महिन्यात नालेसफाईच्या अर्धवट कामांवरून महापालिका प्रशासनालाचा मोठी टीका सहन करावी लागली होती. त्यावेळी प्रशासनाने काम पूर्ण झाल्याची टक्केवारी दाखवत वेळ मारून नेण्याचा केलेला प्रयत्न मुंबईकरांसाठी त्रासदायक ठरला. 


2 ) पेव्हर ब्लॉक, सिमेंट क्राँक्रिटने पाणी मुरण्यास अडचण

पावसाचे पाणी जमिनीत, मातीत मुरावे लागते पेव्हर ब्लॉक, सिमेंट क्राँक्रिटच्या रस्त्यांनी मातीत पाणी मुरण्यास अडथळा येतो आहे. नदी, नाल्यातून बाहेर पडू पाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला तिवराची झाडे रोखून धरतात. परंतु मुंबईत पुराला किंवा जोरदार पाण्याच्या प्रवाहाला रोखणाऱ्या या तिन्ही गोष्टी नाहीत. 


3 ) तिवरांची कत्तल सुरूच, प्रशासनाचा कानाडोळा

तिवरांची कत्तल करून मुंबईकरांनी मिठी, दहिसर नदीतील पाण्याला खुले आव्हान दिले आहे. मुंबईकरांनी मिठी आणि दहिसर नदीला नाल्याचे रूप दिले असून याकडे सरकार आणि संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे. मुंबईतून नाले हद्दपार होत असल्याचा आरोप पर्यावरणवादी, वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी केला आहे. मिठीलगतच्या तिवरांची कत्तल करून बीकेसीला आर्थिक केंद्र बनविणारे सरकारही केवळ २६ जुलैच नव्हे, तर मंगळवारच्या पुराला कारणीभूत आहे. यापुढे पुन्हा नैसर्गिक आपत्ती आली तर त्यामागे मिठी आणि बीकेसी हेच मुख्य कारण असेल, असेही स्टॅलिन यांनी स्पष्ट केले. 


4 ) जुने नाले बंद, नवे नाले बांधण्याकडे दुर्लक्ष

मुंबईतील नाले सफाईवर महापालिकेकडून दरवर्षी खर्च होणारे कोट्यवधी रुपये पाण्यात जात आहेत. या मागचे कारण म्हणजे मुंबईतील ड्रेनेजचा योग्यरित्या विचारच होत नसल्याचे पर्यावरण अभ्यासक ऋषी अग्रवाल अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईतील नव्या बांधकामादरम्यान ड्रेनेजकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. जुने नाले बंद केले जात असून नवीन नाले बांधले जात नाहीत वा बांधले तरी ते नाले पाणी वाहून नेण्यासाठी सक्षम नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेने आता तरी जागे व्हावे आणि बांधकामांना परवानगी देताना ड्रेनेजचे नियम कडक करावेत, अशी मागणी अग्रवाल यांनी केली.


5 ) मिठी, दहिसर नदीला अतिक्रमणाचा विळखा तसाच 

मिठीची साफसफाई करणे, मिठीलगतची अतिक्रमणे काढून टाकणे, तिवरांची कत्तल थांबवणे, इतर नद्या, नाल्यांची सफाई, सांडपाणी वाहून नेण्यासाठी सक्षम व्यवस्था आणि नव्या बांधकामांचे नियोजन याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने २९ आॅगस्टचा दिवस उजाडला. भविष्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. दहिसर नदी प्रदूषणमुक्त केली तर उपनगरातील पुराचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागेल. हे वनशक्ती गेल्या कित्येक वर्षांपासून सांगत आहे, पण याकडे महापालिका आणि सरकार दुर्लक्षच करत आहे. त्यामुळेच शेवटी दहिसर नदी वाचवण्यासाठी वनशक्तीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.    


6 ) तिवरांच्या संरक्षणासाठी बांधलेल्या भिंतींमुळे पाण्याचा निचरा अवघड

मिठीची अतिक्रमणे आणि तिवरांच्या बाजूकडील संरक्षण भिंती काढल्यास बऱ्यापैकी पाणी वाहून जाऊ शकते. या संरक्षण भिंती काढण्याची गरज असताना उलट तिवरांलगत आणखी संरक्षक भिंती बांधण्याचा घाट कांदळवण कक्षाने घातला आहे. यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होईल, असे म्हणत ऋषी अग्रवाल यांनी कांदळवण कक्षाच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. गेल्या १५ वर्षांत तिवरांची प्रचंड प्रमाणात कत्तल झाल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले. तिवरे वाचवली नाही, तर पुढे काय होईल? हे सांगायला कुणा ज्योतिष्याची गरज नाही. हा प्रकार म्हणजे मुंबईला विनाशाच्या दिशेने नेले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.


7 ) मेट्रोच्या कामामुळे गटार, ड्रेनेज लाईन बंद  

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-३, दहिसर ते अंधेरी मेट्रो-७ सह मेट्रो-२ चे काम सध्या मुंबईत वेगात सुरू आहे. या कामासाठी मुख्य रस्त्यांवर, द्रुतगती मार्गांवर बॅरीगेटस लावत रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे साहजिकच स्थानिक ठिकाणचे पाणी वाहून नेणारे नाले, गटार बंद झाले आहेत. यामुळेही मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्याचे म्हटले जात आहे.


पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, ही परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार आणि महापालिकेने पोटतिडकीने प्रयत्न करण्याची गरज आहे. २६ जुलैच्या प्रलयाला जी कारणे जबाबदार होती, तीच कारणे २९ ऑगस्टच्या महापुरामागेही आहेत. याचा स्पष्ट अर्थ २६ जुलैच्या महापुरातून सरकार, महापालिका आणि जनतेने कोणताही धडा घेतलेला नाही, पुराची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याऐवजी सरकारचा कल परिस्थिती आणखी गंभीर होण्यालाच हातभार लावत असल्याचा गंभीर आरोप पर्यावरण तज्ज्ञांनी केला आहे. 



हे देखील वाचा -

वरळीत पडला सगळ्यात जास्त पाऊस



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा