मिठीची परिस्थिती आजही जैसे थे!


मिठीची परिस्थिती आजही जैसे थे!
SHARES

26 जुलै 2005 च्या भयानक पावसाने मुंबईकरांची झोप ज्या मिठी नदीमुळे उडाली होती त्या मिठी नदीची अवस्था आजही काही खास नाही. याचे कारण आहे कलिना विभागात असलेले लहान-मोठे कारखाने आणि मिठी नदीत साचलेली घाण. मात्र या सगळ्यांचा त्रास सहन करावा लागतोय येथे राहणाऱ्या नागरिकांना.

कलिना येथील मिठीच्या याच परिसराचे सुंदरनगर बनावे, म्हणून इथल्या नागरिकांनी अनेक प्रयत्न केले. परिसर काही स्वच्छ-सुंदर होण्याचे नाव घेईना. मात्र 12 जानेवारी 2013 साली मनपाच्या अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट (एएलएम)च्या प्रयत्नाने आणि स्थानिकांच्या मदतीने हा परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत झाली आणि यातूनच 'सुंदरनगर रेसिडेंट असोसिएशन'ची स्थापना झाली.

विशेष म्हणजे, आजही सुंदरनगर रेसिंडेंटसच्या वतीने महानगरपालिकेकडे या परिसराच्या विकासासाठी पाठपुरावा केला जातो. एवढेच नाही तर, असोसिएशनचे सभासद कॅइल्ड एस्टीबेईरो हे विभागाची पाहणी करून अधिकारी वर्गाला आपल्या विभागातील समस्या सांगतात. मात्र आजही परिसरातील मिठी नदीतील काळवट आणि घाण काही साफ झाली नाही. त्यामुळे पुन्हा 26 जुलैसारखी परिस्थिती उद्भभवते की काय? अशी भीती वाटू लागल्याचे सुंदरनगर रेसिडेंट असोसिएशनचे अध्यक्ष सी. जे. पिंटो यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितले.

दरम्यान, याबाबत मनपा एएलएमचे अधिकारी सुभाष पाटील यांना विचारले असता त्यांनी मनपा आपल्या परीने काम करते. मात्र नागरिक पुन्हा त्यात कचरा टाकत असल्याने मिठी नदी भरत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे लोकांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करून नियोजन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित विषय