Advertisement

मेट्रो- ३ च्या कामाची कृपा... चर्चगेटमधील रहिवाशांना केमिकलयुक्त पाणी


मेट्रो- ३ च्या कामाची कृपा... चर्चगेटमधील रहिवाशांना केमिकलयुक्त पाणी
SHARES

चर्चगेट, जे. टाटा रोडवरील मोतीमहल, रवींद्र मेन्शन, लोटस कोर्ट येथील काही इमारतींमधील रहिवासी सध्या दूषित पाण्यामुळे चांगलेच त्रासले आहेत. बुधवारपासून या परिसरात दूषित आणि केमिकलयुक्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. या दूषित पाण्यामुळे डोळ्यांची जळजळ, त्वचेला खाज येत असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या आहेत. हे दूषित पाणी मुंबई महापालिकेच्या नव्हे, तर 'मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन' (एमएमआरसी)च्या चुकीच्या कामामुळे येत आहे.

या परिसरात मेट्रो-३ च्या कामासाठी खोदकाम सुरू अाहे. हे काम करताना येथील इमारतींना पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनींना तडा गेला. जलवाहिनीला गळती लागल्याने त्यातून मेट्रो- ३ च्या पायलिंगसाठी वापरण्यात येणारे केमिकल थेट रहिवाशांच्या घरात जात आहे.



मेट्रो- ३ चा मार्ग संपूर्णत: भुयारी असल्याने त्यासाठी भूमिगत वाहिन्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या भूमिगत वाहिन्यांचे स्थलांतर करणे, या वाहिन्यांना कोणताही धक्का पोहचणार नाही याची जबाबादारी नियमानुसार प्रकल्प राबवणाऱ्याचीच असते. त्यानुसार 'एमएमआरसी'ने भूमिगत वाहिन्यांना कोणताही धक्का पोहोचणार नाही, असा दावा केला होता. पण हा दावा काम सुरू झाल्यानंतर साफ खोटा ठरल्याचे चर्चगेट परिसरातील मोती महलमधील रहिवासी केतन मेहता यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना सांगितले.


जबाबदारी झटकली

बुधवारी चर्चगेट परिसरात दूषित, केमिकलयुक्त पाणी येऊ लागल्यावर रहिवाशांनी त्वरीत मेट्रो- ३ च्या कामासाठी खोदकाम होत असलेल्या ठिकाणी धाव घेत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या तक्रारीनुसार अधिकाऱ्यांनी तपासणी करून तात्काळ दुरूस्ती करणे आवश्यक होते. पण कंत्राटदाराने वा 'एमएमआरसी'च्या उपस्थित कर्मचाऱ्यांनी ही जबाबदारी महापालिकेवर टाकून हात वर केल्याचे मेहता म्हणाले.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी करून दुरूस्तीसंदर्भातील माहिती कंत्राटदार आणि 'एमएमआरसी'ला दिली. पण अजूनही ही दुरूस्ती झालेली नाही. महापालिकेच्या म्हणण्यानुसार ही जबाबदारी सर्वस्वी एमएमआरसी आणि कंत्राटदाराची आहे. या टोलवाटोलवीमुळे रहिवासी मात्र तहानलेलेच आहेत. हे काम 'एमएमआरएसी'चे असल्याने त्यांनी त्वरीत जलवाहिनी दुरूस्त करण्याची मागणी या रहिवाशांनी केली आहे.



टँकरमधून पाणीपुरवठा

सद्यस्थितीत मोतीमहल, रवींद्र मेन्शन आणि लोटस कोर्टमधील इमारतींचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. सोसायटीने टँकरने पाणीपुरवठा सुरू केला असून पिण्यासाठी बिस्लरीचे पाणी वापरावे लागत असल्याचेही मेहता यांनी सांगितले.

यासंदर्भातील प्रतिक्रियेसाठी 'एमएमआरसी'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु तो होऊ शकला नाही. प्रसारमाध्यमांशी न बोलण्याचा अलिखित नियम काही दिवसांपासून 'एमएमआरसी'त रुढ झाला आहे.


आता आमचे काय होणार ?

या घटनेनंतर गिरगाव, काळबादेवीसारख्या १०० ते १५० वर्षे जुन्या इमारती, जलवाहिन्या, अतिधोकायदायक इमारती असलेल्या परिसरात भुयारी मार्गाच्या टनेलिंगचे काम सुरू झाल्यावर काय होणार? हाच प्रश्न आता आम्हाला सतावत आहे. जलवाहिन्या फुटण्यासोबत इमारती कोसळण्याची भितीही आता वाढली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्वरीत या घटनेकडे गांभीर्याने पाहावे, अशी आमची विनंती आहे.
जमशेद सुखडवाला, स्ट्रक्चरल इंजिनीअर, चिराबाजार येथील रहिवासी



हे देखील वाचा -

मेट्रो 3चं रात्रीचं काम बंद; उच्च न्यायालयाचे आदेश

बाप्पा पावला, मेट्रो बॅरीगेटसचा अडथळा दूर


 

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा