Advertisement

मेट्रो 3चं रात्रीचं काम बंद; उच्च न्यायालयाचे आदेश


मेट्रो 3चं रात्रीचं काम बंद; उच्च न्यायालयाचे आदेश
SHARES

मेट्रो-3 च्या कामाचा आवाज आता सहन होत नाही, या आवाजामुळे मनस्ताप होत असल्याचे म्हणत कफ परेडमधील एका रहिवाशाने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार शुक्रवारी उच्च न्यायालयाने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ला रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत काम बंद ठेवण्याचा अंतरिम आदेश दिल्याची माहिती याचिकाकर्ते आणि वकील अॅड. रॉबिन जयसिंघानी यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. तर यासंबंधीची पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

कुलाबा-वांद्रे-सिप्झ या भुयारी मेट्रो-3 मार्गाचे काम कफ परेडमध्ये जिथे सुरू आहे, तिथून हाकेच्या अंतरावर राॅबिन जयसिंघानी आपल्या कुटुंबासमवेत राहतात. पण फेब्रुवारीत मेट्रो-3 चे काम सुरू झाल्यापासून आपल्या कुटुंबाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे म्हणत त्यांनी नुकतीच उच्च न्यायालयात धाव घेतली होती. निवासी परिसरात दिवसा कोणतेही काम करताना आवाज 55 डेसिबलच्या आत असायला हवा. असे असताना या नियमाचा भंग करत एमएमआरसीच्या कंत्राटदाराकडून निवासी परिसरात दिवसभर 100 डेसिबलचा आवाज करत काम केले जात आहे. त्यामुळे घरात एकमेकांशी बोलणेही शक्य होत नसल्याचे अॅड. जयसिंघानी यांनी याचिकेत म्हटले आहे.

दिवसा मशीनची घरघर असतेच, पण रात्रभरही आवाज होत असल्याने रात्रीची झोपही उडाली असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. मुळात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारे आवाजाचे काम करता येत नाही. असे असताना एमएमआरसीच्या कंत्राटदारांकडून मात्र रात्रीच्या वेळेसही आवाजाची कामे केली जात असल्याचा अॅड. जयसिंघानी यांचा आरोप आहे. रात्रीच्या वेळेस 90 ते 100 डेसिबल इतका आवाज असल्याने आपल्या कुटुंबाचे स्वास्थ्य बिघडल्याचेही त्यांनी याचिकेत नमूद केले आहे. तर या मनस्तापामुळे आपल्याला दिवसाला प्रत्येक सदस्यामागे 10 रुपये इतका मोबदला एमएमआरसीकडून मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ज्या दिवसापासून काम सुरू झाले अर्थात फेब्रुवारीपासून ते निर्णय होईपर्यंतच्या मोबदल्याची मागणी त्यांनी केली आहे.

त्यानुसार शुक्रवारी यासंबंधीची सुनावणी उच्च न्यायालयात पार पडली. यावेळी अॅड. जयसिंघानी यांनी कशाप्रकारे या प्रकल्पाद्वारे ध्वनिप्रदुषणासंदर्भातील कायद्याचा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा भंग होतो हे मांडले. एमएमआरसीच्या वकिलांकडून मात्र रात्रीच्या वेळेस कोणत्याही प्रकारे आवाज होत नसल्याचा दावा करण्यात आला. पण शेवटी उच्च न्यायालयाने रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत काम बंद ठेवण्याचे आदेश देत दोन आठवड्यानंतर यावरील सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे आता दोन आठवड्यांनंतर नेमके काय होते? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पण न्यायालयाच्या या आदेशामुळे मेट्रोच्या कामाच्या आवाजामुळे त्रस्त झालेल्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.



हेही वाचा

'एमएमआरसी'चा रात्रीस खेळ चाले!


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा