Advertisement

मेट्रोकडून हवा मनस्तापाचा मोबदला पर डे रुपये दहा हजार! कफ परेडवासीयाची न्यायालयात धाव


मेट्रोकडून हवा मनस्तापाचा मोबदला पर डे रुपये दहा हजार! कफ परेडवासीयाची न्यायालयात धाव
SHARES

मेट्रो-3, मुंबईकरांच्या उज्वल भविष्याकरता... असे म्हणत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ने मेट्रो-3 च्या कामाला वेग दिला आहे. मेट्रो-3 चे काम निश्चित वेळेत पूर्ण करण्याचा चंग एमएमआरसीनेच नव्हे तर राज्य सरकारनेही बांधला आहे. त्यामुळेच ध्वनीप्रदुषणासंदर्भातील नियम, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर ठेवत रात्रंदिवस मेट्रो-3चे काम संपूर्ण पट्टयात सुरू आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांचे भविष्य उज्जवल होईल की नाही, हे येणारा काळच ठरवेल. मात्र या प्रकल्पामुळे आजच्या घडीला अनेक कुटुंबांचा वर्तमान बिघडला असून भविष्यकाळ धोक्यात आहे. ही कैफियत आहे मेट्रो-3 च्या कामामुळे हैराण झालेल्या, जगणंही मुश्किल झालेल्या कुटुंबांची. कफ परेडमधल्या रॉबीन जयसिंघानिया या रहिवाश्याने तर याबाबतीत थेट उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. आपल्याला होणाऱ्या मनस्तापाची जबाबदारी स्वीकारत मेट्रोने आपल्याला प्रतिदिन दहा हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.  


का हवेत पर डे 10 हजार रुपये?


कफ परेडमधील एका इमारतीत रॉबीन जयसिंघानिया पत्नी आणि दोन लहानग्या मुलीं (एक आठ वर्षांची तर दुसरी चार वर्षांची) समवेत रहातात. त्यांच्या घरासमोर, हाकेच्या अंतरावर मेट्रो-3 चे काम सुरू आहे. आतापर्यंत अगदी सुखात आयुष्य जगणाऱ्या या कुटुंबाचे जगणे फेब्रुवारीपासून कठीण झाल्याचा दावा जयसिंघानिया यांनी केला आहे. याचे कारण म्हणजे मेट्रो-3 चे काम. फेब्रुवारीपासून कफ परेड परिसरात काम सुरू असून हे काम रात्रंदिवस, 24 तास सुरू आहे. मोठाल्या मशिनची घरघर दिवसाच नव्हे तर रात्रीही सुरू असते. दिवसा घरात एकमेकांशी संवाद साधणेही आवाजामुळे अशक्य झाले आहे. इतकेच नव्हे तर रात्रीची शांत झोप काय असते, याचाही विसर या कुटुंबाला पडल्याचे जयसिंघानियांचे म्हणणे आहे. शांत, पुरेशी झोप नाही, त्यामुळे डोकेदुखी, सर्दीचा त्रास, त्यातून औषधांचा भडीमार. मग त्यातून उद्भवणारी चिडचिडही स्वाभाविकच. यापेक्षाही मोठा त्रास म्हणजे दोन लहानग्या मुलींना पुरेशी झोप मिळत नसल्याने त्यांचेही स्वास्थ बिघडले. एखादा प्रकल्प एखाद्याच्या जीवापेक्षा मोठा आहे का? असा सवाल करत जयसिंघानिया यांनी थेट उच्च न्यायालयातच धाव घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातील प्रत्येक सदस्यामागे दिवसाला 10 हजार रुपये इतकी नुकसान भरपाईही त्यांनी मागितली आहे.


सात महिन्यांचा मोबदला हवा


कोणताही आणि कितीही मोठा पायाभूत सुविधा प्रकल्प असो, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेतच काम करता येते. त्यातही निवासी परिसरात काम करताना मशिनचा आवाज किती डेसिबल असावा याचे कडक नियमही घालण्यात आले आहे. असे असताना मेट्रो-3 मध्ये मात्र हे सर्व नियम, न्यायालयाचे आदेश धाब्यावर ठेवण्यात आल्याचा आरोप जयसिंघानिया यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना केला आहे. रात्रंदिवस काम सुरू असून मोठाल्या मशिनची घरघर फेब्रुवारीपासून कफ परेड परिसरात सुरू आहे. हा आवाज सहन होत नसल्याने वारंवार पोलिसांकडे तक्रारी केल्या, पण त्याचा काहीही फायदा होत नाही. तर सर्व स्तरांवर तक्रारी करुन झाल्या, पण पदरात काहीही पडत नसल्याने शेवटी न्यायालयाची वाट धरल्याचेही जयसिंघानिया यांनी स्पष्ट केले आहे.


कंत्राटदाराकडून धमकी?


जयसिंघानिया यांच्या याचिकेनुसार ध्वनीप्रदुषणाच्या कायद्याचे उल्लंघन या प्रकल्पात होत असल्याचा दावा ठोकत एमएमआरसी, कंत्राटदारांसह अन्य संबंधित यंत्रणांनाही त्यांनी न्यायालयात खेचले आहे. ध्वनीप्रदुषणामुळे, एखाद्या कामामुळे होणाऱ्या आवाजामुळे स्थानिकांना त्रास झाला तर त्याबदल्यात नुकसान भरपाई, मोबदला मागण्याचा अधिकार संबंधिताला असल्याचा निर्वाळाही न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार जयसिंघानिया यांनी मेट्रो-3 च्या कामाच्या आवाजामुळे आपल्या कुटुंबाचे जगणे कठीण झाल्याचे म्हणत दिवसाला प्रत्येक सदस्यामागे 10 हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणीही याचिकेत केली आहे. महत्त्वाचे म्हणजे फेब्रुवारीपासून ही नुकसान भरपाई मागण्यात आली आहे. जयसिंघानिया यांच्या या याचिकेमुळे चांगलीच खळबळ उडाली असून एमएमआरसीला, मेट्रो-3 ला हा मोठा दणका मानला जात आहे. तर या याचिकेमुळे प्रकल्पात अडचणी येण्याचीही शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे आता या याचिकेच्या सुनावणीकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

फेब्रुवारीपासून आजपर्यंत रात्रीच्या वेळेस कितीतरी तक्रारी पोलिसांकडे केल्या. कंत्राटदाराला विनवणी केली. एमएमआरसीला साकडे घातलं. आमच्या सोसायटीने सह्यांची मोहिम राबवत एक पत्र एमएमआरसीला पाठवलं. पण काहीच फायदा नाही. रात्रीच्या वेळेस तरी काम बंद ठेवणं सोडून द्या, उलट कंत्राटदाराकडून मलाच धमक्या दिल्या जात आहेत. या परिस्थितीत माझ्यासमोर कोणताच पर्याय नव्हता. म्हणून मी न्यायालयात धाव घेतली आहे. आता बघू या पुढे काय होतं. पण हे नक्की आहे की हा आवाज आता आम्हाला सहन होत नाही. त्यामुळे किमान रात्रीच्या वेळेस तरी हा आवाज बंद झालाच पाहिजे, ही आमची मागणी आहे.

- रॉबीन जयसिंघानिया, याचिकाकर्ते




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा