Advertisement

'मेट्रो ३'मुळे झाले धंद्याचे वांदे!


'मेट्रो ३'मुळे झाले धंद्याचे वांदे!
SHARES

मुंबई - 'मुंबईकरांच्या उज्वल भविष्याकरता', अशी हाक देत एमएमआरसीनं 'मेट्रो-3'चं काम सुरू केलंय. या प्रकल्पामुळे मुंबईकरांचं भविष्य उज्वल होईल की नाही हे माहीत नाही. पण सध्या मेट्रोच्या कामामुळे मात्र अनेकांचे भविष्य अंधारात जातंय की काय असंच चित्र दिसतंय. मेट्रोच्या कामाच्या आवाजामुळे रहिवाशांची रात्रीची झोप उडाली आहे. तर म्हशींनादेखील मेट्रोच्या कामाचा आवाज सहन होत नसल्यानं दुधाचे वांदे झाले आहेत. तर झाडांची कत्तल होणार असल्यानं पर्यावरणप्रेमींना पर्यावरणाची चिंता सतावू लागली आहे. असं असताना आता मेट्रोच्या कामामुळे प्रभादेवी, दादर, माटुंगा, माहिममधील दुकानदारांच्या धंद्याचेही वांदे झाले आहेत.

मेट्रोच्या कामाकरीत संपूर्ण गोखले रोडवर बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत. हे बॅरिगेट्स रस्त्याला लागून असलेल्या दुकानांपासून एक ते दीड फुटांवर लावले आहेत. त्यामुळे गोखले रोडवरील सर्व दुकानं झाकली गेल्यानं ग्राहक कमी झाले आहेत. परिणामी दुकानदारांचा धंदा 50 ते 70 टक्क्यांनी कमी झाल्यानं दुकानदार चिंताग्रस्त झाले आहेत.

"गिऱ्हाईकांना दुकानात येण्यासाठी जागाच नाही आहे. कित्येक वेळा चोऱ्याही झाल्या आहेत. यामुळे  ७൦ टक्के व्यवसायाचं नुकसान झालं आहे. कसाबसा ३൦ टक्के व्यवसाय होतोय. आम्हाला नुकसान भरपाई मिळायला हवी."

-प्रिया पलसवकर, दुकान मालक

पुढची पाच-सहा वर्षे तरी हे बॅरिगेट्स हटणार नसल्यानं आता आमच्या धंद्याचे काय होणार? की आम्हालाही शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करावी लागेल? असा सवाल आता या दुकानदारांनी उपस्थित करत एमएमआरसीकडे मोबदल्याची मागणी केली आहे.


"पादचाऱ्यांनाही ये-जा करण्यासाठी मोठी गैरसोय होत आहेत. निमुळत्या जागेतून वाट काढत कसंबसं पादचाऱ्यांना ये-जा करावी लागत आहे. तर जागा कमी असल्यानं पादचाऱ्यांमध्ये वाद होत असून एक-दोन अपघातही झालेत. तसेच आम्ही विकासाला विरोध नाही करत आहोत. विकास होतोय, आमचा त्याला पाठिंबाच आहे. पण एमएमआरसीनेही आम्हाला समजून घ्यावे. या कामामुळे आम्हाला प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. आम्ही सर्व दुकानदार एकत्र येऊन नुकसान भरपाईची मागणी करणार आहोत."

-भुपेंद्र गडकरी, दुकान मालक

दुकानदारांच्या या अडचणींबाबत आणि त्यांच्या मोबदल्याच्या मागणीबाबात मुंबई लाईव्हनं एमएमआरसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पण गेल्या काही दिवसांपासून एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी न बोलण्याचा निर्णय घेतल्यानं अधिकारी नॉट रिचेबल झाले आहेत. असं असलं तरी आता या नॉट रिचेबल अधिकाऱ्यांना दणका देत रिचेबल करण्याचा निर्णय या दुकानदारांनी घेतला आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरत आंदोलनाची तयारीही या दुकान मालकांनी दाखवली आहे. त्यामुळे येत्या काळात एमएमआरसी विरूद्ध दुकान मालक असा संघर्ष पाहायला मिळणार हे नक्की.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा