मेट्रो-3 ची 'नाईट शिफ्ट' आणि रहिवाशांचं जागरण!

 Mumbai
मेट्रो-3 ची 'नाईट शिफ्ट' आणि रहिवाशांचं जागरण!
Mumbai  -  

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-3च्या कामाच्या आवाजाने दक्षिण मुंबईतील रहिवाशांसह मरोळ गाव, सहार गाव, विमानतळ परिसरातील रहिवाशांची झोप उडाली आहे. रात्रभर मोठाल्या मशिनची घर-घर सुरूच असल्याने रहिवाशी त्रस्त झाले आहेत. पोलिसांसह मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)कडे तक्रारींवर तक्रारी करूनही काही होत नसल्याने आता रहिवाशी संतप्त झाले आहेत. त्यामुळे मरोळ आणि सहार गावमधील रहिवाशांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 

वॉचडॉग फाऊंडेशनने नुकतेच रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या कामासंदर्भात थेट पोलिस आयुक्तांना पत्र लिहित तक्रार केली आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी दक्षिण मुंबईतील रहिवाशांनी तक्रार केली असता कामाच्या ठिकाणी जाऊन काम बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याने काही दिवस काम बंद होते. पण आता पुन्हा रात्रीच्या वेळेस काम करण्यात येत आहे. तर मरोळ, सहार गावमध्ये तर सुरूवातीपासूनच रात्रीच्या वेळेस काम सुरू असल्याची माहिती वॉचडॉगने दिली आहे.

सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेतच काम करण्याची परवानगी असते. असे असताना मेट्रो-3 प्रकल्पाचे काम मात्र रात्री 10 नंतरही सुरू असल्याचे चित्र आहे. विधान भवन मार्ग, चर्चगेट स्थानक, मरोळ गाव, सहार गाव अशा अनेक ठिकाणी रात्री उशीरापर्यंत काम सुरू आहे. 

कामासाठी मोठमोठ्या मशिन वापरल्या जात असल्याने या मशिनच्या आवाजाने रहिवाशांची झोप उडाली आहे. रहिवाशांकडून यासंदर्भात 100 क्रमांकावर वारंवार तक्रार केली जात आहे. पण त्याची योग्य ती दखल घेतली जात नाही. त्यामुळे पोलिस आयुक्तांनाच एक पत्र लिहित यासंबंधीची तक्रार करण्यात आली आहे.

गॉडफ्रे पिमेंटा, वॉचडॉग

सोमवारी रात्री वाय. बी. चव्हाण सेंटर परिसरातील रहिवाशांकडून रात्रीच्या वेळेस सुरू असलेल्या कामाबाबत दोन तक्रारी तर हँगिंग गार्डन परिसरातील रहिवाशांकडूनही तक्रार नोंदवण्यात आल्याचे वॉचडॉग कडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, रात्रीच्या वेळेस रहिवाशांना कामाचा त्रास होऊ नये यासाठी सुचवण्यात आलेल्या आवश्यक त्या उपाययोजना, जसे की नॉईज बॅरिअर लावण्यासारख्या सूचनांचीही अंमलबजावणी अद्याप कंत्राटदाराकडून झालेली नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळेस सुरू असलेल्या कामामुळे रहिवाशांचा त्रास वाढतच चालला आहे. 

पोलिस दखल घेत नाहीत, कंत्राटदार एेकत नाही आणि एमएमआरसी लक्ष देत नाही, त्यामुळे आता काय करायचं? असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. त्यामुळे आता रस्त्यावर उतरावे लागणार असे म्हणत वॉचडॉगने मेट्रो-3 च्या रात्रीच्या वेळेस सुरू असलेल्या कामाविरोधात लवकरच मोठे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.हेही वाचा

'एमएमआरसी'चा रात्रीस खेळ चाले!


Loading Comments