Advertisement

ब्रम्हकुमारी रुणालयात रुग्णांच्या जिवाशी खेळ?


ब्रम्हकुमारी रुणालयात रुग्णांच्या जिवाशी खेळ?
SHARES

अंधेरीतील ब्रम्हकुमारी रुग्णालयाकडे गेल्या 10 वर्षांपासून अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) नसल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. वॉचडॉग फाऊंडेशनचे संचालक गॉडफ्रे पिमेंटा आणि निकोलस अल्मेडा यांनी याबाबतची तक्रार महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्याकडे ई-मेल द्वारे केलीय.

ब्रम्हकुमारी रुग्णालयात एकूण 100 बेड असून चार इंटेन्सिव्ह केअर युनिट आहेत. 2007 पासून या रुग्णालयाला अग्निशमन दलाचे 'ना हरकत प्रमाणपत्र' मिळालेले नाही. रुग्णालयाच्या शेजारीच पालिकेचे के पश्चिम विभाग कार्यालय आहे. या रुग्णालयात कुठल्याही ठिकाणी आग लागल्यास रुग्णालयासोबत पालिकेचे कार्यालयही आगीच्या विळख्यात सापडू शकते. यामुळे तेथील महत्त्वाची कागदपत्रे आणि मनुष्यहानी होण्याची भीतीही वॉचडॉग फाऊंडेशनकडून वर्तवण्यात आलीय.

या रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर उपहारगृह, तळमजल्यावर कॉम्प्रेसर, लाँड्री, गोदाम आणि संगणक कक्ष असे सारे काही एकाच खोलीत आहे. याची माहिती अल्मेडा यांनी आयुक्तांना ई-मेल द्वारे कळवली आहे. तसंच तळमजल्यावरील उपहारगृहही बेकायदेशीररित्या बांधण्यात आल्याचा आरोप अल्मेडा यांनी केलाय. नियमांची पूर्तता न केल्यानं हे रुग्णालय बंद करावं, अशी नोटीस मुंबई महापालिकेकडून रुग्णालयाला बजावण्यात आली होती. असे असूनही रुग्णालय बेधडकपणे सुरूच आहे.

अलिकडेच मुंबईतील नायर रुग्णालयात आग लागली होती. त्यामुळे रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालय प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे, असंही अल्मेडा यांनी स्पष्ट केलंय. ब्रम्हकुमारी रुग्णालयाने अग्निसुरक्षा नियमांच्या तरतुदींचे त्वरीत पालन करावे जेणेकरुन रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना, डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना या रुग्णालयात वावरणं सोयीस्कर होईल. महापालिकेने ब्रम्हकुमारी ट्रस्ट आणि ट्रस्टी यांच्याविरोधात कडक कारवाई करावी अशीही मागणी वॉचडॉग फाऊंडेशनकडून करण्यात आलीय. तसेच मुंबईतील सर्व रुग्णालयांच्या सुरक्षेचं ऑडिट करण्याचा सल्लाही अल्मेडा यांनी दिलाय.

या प्रकरणी महापालिकेच्या अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी प्रभात रहांगदळे यांच्याशी संपर्क साधला असता गेल्या शनिवारी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट दिली. त्या वेळच्या पाहणीचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांनी सादर केला. या अहवालाची पडताळणी झाल्यावर रुग्णालय प्रशासनावर नियमानुसार कारवाई करेल, असं त्यांनी सांगितलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा