Advertisement

'एमएमआरसी'चा रात्रीस खेळ चाले!


'एमएमआरसी'चा रात्रीस खेळ चाले!
SHARES

मेट्रो - 3 प्रकल्पाआड येणाऱ्या झाडांच्या कत्तलीला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिल्यापासून मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी) ने झाडांवर कुऱ्हाड चालविण्याची मोहीम तीव्र केली आहे. मात्र पर्यावरणप्रेमी आणि 'सेव्ह ट्री' संस्थेकडून वारंवार होणाऱ्या हस्तक्षेपाचा धसका घेऊन 'एमएमआरसी' या झाडांवर दिवसा नव्हे, तर रात्रीच्या वेळेस कुऱ्हाड चालवत आहे. याचप्रकारे सोमवारी रात्री दोन वाजता चर्चगेट येथील सम्राट हाॅटेल जवळील 500 वर्षे जुने वडाचे झाड कापण्यात येणार होते. मात्र हे झाड कापण्यासाठी आलेल्या कंत्राटदाराला 'सेव्ह ट्री'च्या सदस्यांनी रोखत हे झाड वाचवल्याची माहिती 'सेव्ह ट्री'च्या सदस्या तसनीम शेख यांनी दिली.

'एमएमआरसी'ने रविवारपासून दक्षिण मुंबईतील झाडांच्या कत्तलीवर जोर दिला आहे. या प्रकल्पाच्या आड येणारी दक्षिण मुंबईतील बहुतांश झाडे तोडण्यात आली आहेत. 'सेव्ह ट्री'च्या सदस्यांच्या नजरेत ही वृक्षतोड येऊ नये म्हणून रात्री दोन नंतर झाडे तोडण्याचा प्रयत्न 'एमएमआरसी' करत असली, तरी प्राधिकरणाच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून असणारे 'सेव्ह ट्री'चे सदस्य तेथे जाऊन काम थांबवत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्रीच्या वेळेस आवाज होणारे कोणतेही काम करता येत नाही. असे असतानाही रात्री झाडांची कत्तल कशी केली जाते ? असा प्रश्न 'सेव्ह ट्री'कडून उपस्थित केला जात आहे. हे काम कायद्यांतर्गत असेल, तर रात्रीच्या कामासाठी आवश्यक परवानगी दाखवा, असे आवाहनही शेख यांनी 'एमएमआरसी'ला केले आहे.

याविषयी 'मुंबई लाइव्ह'ने आवाज फाऊंडेशनच्या सुमेरा अब्दुलाली यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, आवाज होणारे कोणतेही काम रात्रीच्या वेळेस करणे हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन आहे. झाडे कापताना खूप मोठा आवाज होतो. ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचेही येथे उल्लंघन होते. असे काम कुठे होत असल्यास वृक्ष प्राधिकरणाच्या सर्व आवश्यक परवानग्यांसह प्राधिकरणाच्या व्यक्तीने संबंधित ठिकाणी उपस्थित असणे गरजेचे आहे. तसे नसेल तर पर्यावरणप्रेमींनी त्याविरोधात तक्रार करायला हवी.

या विषयावर 'एमएमआरसी'चे वरिष्ठ अधिकारी आर. रमण्णा यांच्याशी संपर्क साधण्यात आला. परंतु ते सुट्टीवर असल्याने त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. कायद्याच्या चौकटीत राहूनच काम होत आहे, अशी प्रतिक्रिया एमएमआरसीच्या प्रवक्त्या वैदेही मोरे यांनी दिली आहे. मात्र, रात्रीच्या वेळेस काम करण्याची परवानगी आहे का याबद्दल बोलण्यास त्यांनी टाळाटाळ केली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा