Advertisement

बाप्पा पावला, मेट्रो बॅरीगेटसचा अडथळा दूर


बाप्पा पावला, मेट्रो बॅरीगेटसचा अडथळा दूर
SHARES

गणपती बाप्पा मोरया, वाटेतले बॅरिगेट्स काढूया असे म्हणत गिरगाव-काळबादेवीसह मुंबईतील गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवातील अडथळा दूर करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले होते. अखेर मेट्रो-3 मार्गातील सर्वच गणेश मंडळांना बाप्पा पावला आहे! कारण मेट्रो-3च्या कामाचा आणि बॅरिगेट्सचा अडथळा दूर करण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ने घेतला आहे. त्यानुसार जिथे गणेश मंडळाच्या मंडपासाठी तसेच गणेश मूर्तीच्या आगमनासह विसर्जनासाठी बॅरिगेट्सचा अडथळा येत होता, त्या ठिकाणचे बॅरिगेट्स काढण्यात आल्याची माहिती एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी दिली आहे.

कुलाबा ते सिप्झ असे अंदाजे 33 किमी मार्गावर मेट्रो-3चे काम सुरू आहे. कामासाठी रस्त्यावर, मुख्य रस्त्यावर, द्रुतगती मार्गावर बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. या कामाचा आणि बॅरिगेट्सचा अडथळा यंदा गणेशोत्सवात येणार होता. त्यामुळे मुंबईतील गणेशोत्सव मंडळांसह समन्वय समितीने मेट्रो-3चे काम बंद ठेवत बॅरिगेट्स हटवण्याची मागणी एमएमआरसीकडे केली होती. त्यासाठी 7 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्रही पाठवले होते.

दरम्यान, एमएमआरसी या मागणीकडे कानाडोळा करत असल्याने आणि मंडप बांधण्यात वा गणेश मूर्ती वाजत गाजत आणण्यात बॅरिगेट्सचा मोठा अडथळा येत होता. त्यामुळे दहा-बारा दिवसांपूर्वी गिरगाव-काळबादेवी परिसरातील मंडळांनी आणि शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत एमएमआरसीला दणका दिला. या दणक्यानंतर या परिसरातील बॅरिगेट्स एमएमआरसीने हटवले होते. मात्र अऩ्य मार्गातील बॅरिगेट्सचा प्रश्न जैसे थेच होता. पण आता हा प्रश्नही एमएमआरसीने निकाली काढला आहे.

भिडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅकेज-1 कफ परेड परिसर, पॅकेज 3 मुंबई सेंट्रल ते वरळी आणि पॅकेज 7 सांताक्रुझ ते सिप्झ या परिसरात कुठेही मेट्रोच्या बॅरिगेट्सचा अडथळा गणेश मंडप, मूर्ती आगमन आणि विसर्जनासाठी येत नाही. त्यामुळे या तीन पॅकेजमध्ये कुठेही काम बंद ठेवत बॅरिगेट्स हटवण्यात आलेले नाहीत. पॅकेज 2 गिरगाव-काळबादेवी परिसरात गणेश मंडपासाठी मूर्तींचे आगमन आणि विसर्जनासाठी अडथळा ठरणारे बॅरिगेट्स हटवण्यात आले आहेत. तर विसर्जनाच्या 5 व्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत बॅरिगेट्सचा कोणताही अडथळा येणार नाही यासाठी बॅरिगेट्स हटवण्यात येणार आहेत. पॅकेज 4 सिद्धिविनायक ते शितळादेवी परिसरात गणेश मंडपासाठी बॅरिगेट्सचा अडथळा नसला तरी गणेश मूर्ती आगमन आणि विसर्जनामध्ये अडथळा येणार आहे. त्यामुळे पाचव्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत मेट्रो-3 चे बॅरिगेट्स हटवण्यात येणार असल्याचे भिडे यांनी स्पष्ट केले आहे.

पॅकेज 5 माहिम ते धारावी परिसरातही केवळ मूर्तींचे आगमन आणि विसर्जनासाठी बॅरिगेट्सचा अडथळा असल्याने येथील बॅरिगेट्सही पाचव्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत हटवण्यात येणार आहेत. तर पॅकेज 6 धारावी ते सांताक्रुझ परिसरात ज्या गणेश मंडपासाठी बॅरिगेट्सचा अडथळा येत होता तिथले बॅरिगेट्स हटवण्यात आल्याचेही भिडे यांनी सांगितले आहे. एमएमआरसीच्या या निर्णयामुळे दहा दिवसांचा गणेशोत्सव अगदी उत्साहात पार पडणार हे आता नक्की.



हेही वाचा

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी स्पेशल ट्रेन!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा